रॅनिटिडीन औषधांचा वापर नको

राज इंगळे
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

अचलपूर (जि. अमरावती) : रॅनिटिडीन गोळ्या, इंजेक्‍शन औषधांचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य संचालक विभागाने संपूर्ण राज्यातील आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सकांसह सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यासह मेळघाटात या इंजेक्‍शन गोळ्यांचा वापर थांबविण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीयस्तरावर या औषधांच्या संदर्भात अनेक देशांचे अहवाल एकत्र करण्यात आले. विविध देशांकडील अहवालानुसार रॅनिटिडीन औषधांमध्ये एन नायट्रोसोडामिथेलामाईन कमी प्रमाणात आढळून आले आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेनुसार हा घटक मानवी शरीरासाठी कर्करोगाचे कारण ठरू शकतो. त्यामुळे राज्याच्या अन्न व औषधी विभागाने त्यांच्या अधिनस्थ क्षेत्रातील रॅनिटिडीनच्या उत्पादकांकडील कच्चा माल व इतर आवश्‍यक बाबींची तपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आरोग्य संचालक विभागाने आरोग्य संस्थेमधील उपलब्ध गोळ्या, इंजेक्‍शनचा वापर पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे आदेशात म्हटले आहे.

वरिष्ठस्तरावरून या औषधांचा वापर थांबविण्याचे आदेश आले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना देण्यात आले. सध्या या औषधांचा वापर थांबविण्यात आला आहे.
- डॉ. रेवती साबळे,
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी.

राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना रॅनिटिडीन गोळ्या, इंजेक्‍शन औषधांचा वापर एफडीआयचा अहवाल येईपर्यंत थांबविण्याचे आदेश देण्यात आले. एफडीआयचा तपासणी अहवाल आल्यावर औषधांबाबत निर्णय घेण्यात येईल.
- साधना तायडे,
आरोग्य संचालक, मुंबई.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not use ranitidine medication