भावी डॉक्‍टरांसाठी ‘हॉटलाइन’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

नागपूर - मेडिकलच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार नुकतेच अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. सजल मित्रा यांनी स्वीकारला. अधिष्ठात्यांच्या खुर्चीत विराजमान होताच, येथील डॉक्‍टरांनी माणूस बनायला हवं, हा संदेश दिला. मेडिकल रुग्णासाठी लाइफलाइन आहे. रुग्णहितासह एमबीबीएस, एमडी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘अजेंडा’ जाहीर केला. मेडिकलमध्ये भावी डॉक्‍टरांचे ‘वर्ग’ नियमित व्हावे यासाठी स्वतःच्या मोबाईलवरूनच ‘हॉटलाइन’ तयार करण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. मित्रा यांनी आज सांगितले.

नागपूर - मेडिकलच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार नुकतेच अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. सजल मित्रा यांनी स्वीकारला. अधिष्ठात्यांच्या खुर्चीत विराजमान होताच, येथील डॉक्‍टरांनी माणूस बनायला हवं, हा संदेश दिला. मेडिकल रुग्णासाठी लाइफलाइन आहे. रुग्णहितासह एमबीबीएस, एमडी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘अजेंडा’ जाहीर केला. मेडिकलमध्ये भावी डॉक्‍टरांचे ‘वर्ग’ नियमित व्हावे यासाठी स्वतःच्या मोबाईलवरूनच ‘हॉटलाइन’ तयार करण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. मित्रा यांनी आज सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस आणि एमडीचा विद्यार्थी रुग्णसेवेतील ‘कणा’ आहे. या भावी डॉक्‍टरांच्या हातात रुग्णांचा ‘जीव’ असतो, ही बाब लक्षात घेत केवळ पुस्तकी ज्ञान असणारे डॉक्‍टर तयार करून भागणार नाही, तर प्रात्यक्षिक प्रणाली विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येईल. यासाठी ‘कॉम्पिटन्सी बेस एज्युकेशन’चा आराखडा तयार केला आहे. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित होत नाही, अशी मुलांची ओरड असते. तर मुलेच दांडी मारतात, असे शिक्षक सांगतात या दुखण्यावर मलमपट्टी करण्याची खरी गजर असून, यासाठी स्वतःच्या मोबाईलवरच ‘हॉटलाइन’ तयार केल्याचे डॉ. मित्रा म्हणाले. 

असा असेल हॉटलाइन उपक्रम  
मेडिकलमधील प्रत्येक विद्यार्थ्याला माझा मोबाईल क्रमांक देणार आहे. तासिकेला प्राध्यापकवर्गात हजर न झाल्यास विद्यार्थ्यांनी वर्गखोलीतूनच संपर्क साधावा. संपर्क साधताच ५ मिनिटांत वैद्यकीय शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. उत्तम डॉक्‍टर निर्माण करण्याचा हा भावी डॉक्‍टरांच्या हिताचा अजेंडा तयार केला. सोबतच प्रत्येक निवासी डॉक्‍टरने रुग्णांशी सौजन्याने वागावे, यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात येईल. एमडीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा, यासाठी मेडिकलचे स्वतंत्र ‘जर्नल’ तयार करण्यात येणार आहे.  

मेडिकल अधिक लोकाभिमुख करणार 
मेडिकल लोकाभिमुख आहे यात वाद नाही. परंतु, ते अधिक लोकाभिमुख करण्यावर आमचा भर राहील. रुग्णाला केस पेपर भरण्यासाठी वेळ लागतो, त्यापूर्वी त्याला उपचार मिळावे. 

निदान चाचण्या लवकर व्हाव्या, यासाठी ‘सकाळ’च्या हेल्थ सेक्‍टरसोबत चर्चा करण्यात येईल. विशेष असे की, मेडिकलशी संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण सुरू झाले. आता ‘हृदय’ आणि ‘यकृत’ प्रत्यारोपणासाठी प्रयत्न करण्यात येईल. 

याशिवाय स्पोर्टस इंज्युरी सेंटर उभारण्यात येईल. मेडिकलमध्ये सर्जरी विभागात तीन अतिदक्षता विभागांसह ‘रोबोटिक सर्जरी युनिट’ अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या मार्गदर्शनात मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येकाला अत्याधुनिक उपचार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मित्रा यांनी सांगितले. 

हे प्रकल्प करणार पूर्ण  
  स्पाइन सर्जरी युनिट 
  लंग्स रिसर्च इन्स्टिट्यूट 
  कॅन्सर इन्स्टिट्यूट 
  तीन अतिदक्षता विभाग 
  रोबोटिक सर्जरी युनिट
  सिकलसेल एक्‍सलन्स सेंटर
  बोन मॅरो रजिस्ट्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Hotline