जेनेरिक औषधाला डॉक्‍टरची ना

जेनेरिक औषधाला डॉक्‍टरची ना
नागपूर : एका रुग्णाने ब्रॅंडेडऐवजी "जेनेरिक औषधं' खरेदी केली आणि सुपरमधील डॉक्‍टरसमोर ठेवताच डॉक्‍टर भडकले. जेनेरिक औषधं परत करा आणि संबंधित औषध दुकानातूनच ब्रॅंडेड औषधं खरेदी करा, अशी सक्ती केली. एवढ्यावरच हे डॉक्‍टर महोदय थांबले नाहीत, तर "लक्‍स' आणि "डव्ह' या साबणाच्या वापरानंतर "फिल' वेगळा वाटतो ना...असे उदाहरण देत रुग्णाला बाहेरचा रस्ता दाखवला.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदय शल्यक्रिया विभागातील (सीव्हीटीएस) ही घटना आहे. विदर्भासह मध्य भारतातील रुग्णांच्या आरोग्याचा आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मात्र येथे औषधांचा तुटवडा आहे. यामुळे डॉक्‍टर रुग्णांच्या हाती प्रिस्क्रिप्शन देतात. प्रिस्क्रिप्शनवर ब्रॅंन्डेड औषधं लिहिली जातात. येथील एका अधिव्याख्याता यांनी एका रुग्णाने जेनेरिक औषध खरेदी करून आणल्यानंतर त्याला ब्रॅंडेड औषध खरेदीसाठी आग्रह धरत असल्याचा एक व्हिडिओ क्‍लिप पुढे आली. हे विदारक वास्तव सत्य असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या विभागप्रमुख डॉ. निकुंज पवार यांच्या नेतृत्वात या विभागात अतिशय प्रभावी काम होत आहे. मात्र एका अधिव्याख्याताच्या चुकीच्या वागण्याचा फटका गरीब रुग्णाला बसला आहे. दारिद्य्ररेषेखाली तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांवर मोफत औषधं मिळावे असा नियम आहे. परंतु शासनाने दीड वर्षापूर्वी औषध खरेदीचे अधिकार हाफकीनकडे दिले. रुग्णहित लक्षात घेत डॉक्‍टर नातेवाइकांना बाहेरून औषध आणण्याची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) देतात.
सुपरच्या ह्रदय शल्यक्रिया विभागात दाखल रिताबाई कटारे या रुग्ण महिलेस येथील अधिव्याख्याता डॉ. कुणाल रावेकर यांनी प्रिस्क्रिप्शन दिले. नातेवाइकांनी जेनेरिक औषध खरेदी करून आणले. परंतु डॉ. रावेकर यांनी हे औषध नाकारले. नातेवाइकाला फटकारत विशिष्ट दुकानातून ब्रॅंडेड औषध खरेदी करण्याचा आग्रह धरला. तसेच या महोदयांनी जेनेरिक औषध आणि ब्रॅंडेडसाठी लक्‍स आणि डव्ह साबणाची उपमा सांगत त्यांनी फरकही करून सांगितला. ही व्हिडिओ क्‍लिप सर्वत्र व्हायरल झाली असून या प्रकरणाची तक्रार सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडे करण्यात आली. डॉ. फुलपाटील यांनी डॉ. रावेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हा प्रकार दुर्दैवी आहे. रुग्णांना जेनेरिक औषध खरेदीचा अधिकार आहे. या प्रकरणात संबंधित डॉक्‍टरला कडक शब्दात समज दिली आहे. विभागप्रमुखांशी चर्चा करून यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. दोषी डॉक्‍टरवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com