घरदार, कुटूंब विसरून कोरोना संकटात रुग्णसेवेला प्राधान्य देताहेत डॉक्‍टर

doctor
doctor

यवतमाळ : भारतासह संपूर्ण जगच कोरोना महामारीच्या भीषण संकटात सापडले आहे. कोरोना विषाणूच्या लढाईत डॉक्‍टर सर्वांत पुढे आहेत. रुग्णांना महामारीतून वाचविण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र संघर्ष करीत आहेत. रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांचे योगदान महत्त्वाचे आहेच. तितकेच योगदान लस शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांचेही आहे. या संकट काळात रुग्ण व डॉक्‍टरांतील नाते अधिकच दृढ झाले आहे, असे मत औषधोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी "सकाळ संवाद' मध्ये बोलताना व्यक्त केले.

आजही काही अपवादवगळता डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या रुग्णसेवेची परंपरा डॉक्‍टरांनी कायम ठेवली आहे. डॉक्‍टर व्यावसायिक झाले आहेत, असा आरोपही अधूनमधून होत असतो. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. पैशांच्या मागे धावणारी डॉक्‍टर मंडळी अपवादात्मकच म्हणता येतील. पैसा सर्वांनाच कमवावा लागतो. प्रत्येकालाच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. असे असले तरी प्रपंच नेटका करून परमार्थही साधावा, ही संतांची शिकवण नेहमीच प्रेरणा देत राहते.

आजही जिवाची पर्वा न करता रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अनेक डॉक्‍टर धडपडताना दिसून येत आहेत. कोविडच्या निमित्ताने डॉक्‍टर व रुग्ण यांच्यातील जिवाभावाच्या संबंधांचा जगाला पुन्हा प्रत्यय आला आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टर व आरोग्यसेवक स्वत:सह कुटुंबाला विसरून कोरोनाबाधितांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत.

अंगावर पीपीई कीट चढविली की, अंगाला दरदरून घाम फुटतो. पाणी पिता येत नाही. काही परिचारिका व डॉक्‍टर एवढेच त्यांचे विश्‍व बनते. दिवसभर विषाणूच्या विळख्यात असल्याने बाहेर पडल्यावर आपल्यामुळे कुटुंबीय किंवा मित्रांना संसर्ग होणार तर नाही ना, अशी भावना मनात घर करते. स्वत:ची लहान मुले, पत्नी, वृद्ध आईवडील यांच्यापासून अलिप्तता ठेवणे अपरिहार्य होते. तरुण डॉक्‍टर मंडळींनी खासगी आयुष्यापेक्षा कोरोना लढाईला महत्त्व दिले आहे. कित्येकांनी आपले लग्न पुढे ढकलले आहे. कोरोनामुळे उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांचे कुटुंबच बाधित झाले आहेत तर, परिचयातील मित्रांना जीव गमवावा लागला. रुग्णसेवेसाठी डॉक्‍टरांनी केलेला हा त्यागच म्हणावे लागेल. त्याचीच दखल समाजानेही घेतली आहे. डॉक्‍टरांना कोरोना योद्धे म्हणून वेगळी ओळख दिली आहे.


सविस्तर वाचा - इस चम्पी मे बडे बडे गुन

रुग्णांच्या आरोग्याचा विचार सर्वतोपरी
कोरोनाव्यतिरिक्त इतर अनेक गंभीर आजार आहेत. रस्ते अपघात आहेत. त्यातून रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्‍टर प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. यवतमाळसारख्या ग्रामीण भागात हिराचंद्र मुणोत क्रिटिकेअर हॉस्पिटल सुरू केले. यामागे व्यावसायिकतेबरोबर रुग्णहिताचाही निश्‍चितच विचार केला. गरीब रुग्णांना नागपूर, मुंबईला जाऊन उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे रुग्णांना प्राणही गमवावे लागतात. हे लक्षात घेऊनच विविध सुविधांनी युक्त क्रिटिकेअर हॉस्पिटल सुरू केले. उपचाराचे दर नागपूर व मुंबईपेक्षा कितीतरी कमी आहेत. डॉक्‍टर या नात्याने रुग्णांच्या आरोग्याचा विचार नेहमीच सर्वतोपरी राहिला आहे.
डॉ. दीपक अग्रवाल
संचालक, क्रिटीकेअर रुग्णालय, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com