esakal | डॉक्‍टरांना हवे विम्याचे कवच
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

डॉक्‍टरांना हवे विम्याचे कवच

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (अमरावती) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरारी पथक, फिरते पथक, एनएचएम विभागातील विविध पदांवर कार्यरत असलेले 282 बीएएमएस डॉक्‍टर हे महाराष्ट्रासह मेळघाटात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेवा देत आहेत. मात्र मेळघाटातील पाच डॉक्‍टरांचा सेवा देत असताना मृत्यू झाला. मात्र शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत न देता वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे आता विमा कवच देण्याची मागणी भरारी पथकातील डॉक्‍टरांनी केली आहे.
आदिवासी भागात एमबीबीएस डॉक्‍टर सेवा देण्यास तयार नसल्याची ओरड नेहमीच ऐकला मिळते. त्यामुळे आरोग्यसेवेचा डोलारा बीएएमएस डॉक्‍टरांवर अवलंबून असल्याचे वास्तव आहे. आतापर्यंत मेळघाटात सेवा देत असताना पाच डॉक्‍टरांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. मात्र त्यांच्या कुटुंबांना अद्याप शासकीय मदत करण्यात आली नाही. मानसिक तणावामुळे होणाऱ्या आजारासह व अपघातांमुळे आतापर्यंत पाच डॉक्‍टरांचा मृत्यू झाला आहे तर मेळघाटातील तीन ते चार डॉक्‍टर गंभीर आजाराने त्रस्त आहेत. आदिवासी बांधवांची आरोग्यसेवा करणाऱ्या या डॉक्‍टरांवर योग्य वेळी योग्य उपचार होत नसल्याची गंभीर स्थिती आहे. आर्थिक दृष्टीनेसुद्धा त्यांना काही उपचार न परवडण्यासारखे आहेत. दर महिन्याला औषधांचा खर्च दहा हजारांच्या घरात आहे. त्यातच वेतनसुद्धा वेळेवर होत नाही. सध्या मेळघाटातील आरोग्यसेवा ही भरारी पथकाच्या भरवशावर सुरू आहे. अशा परिस्थितीत काम करताना डॉक्‍टरांच्या आरोग्यास हानी पोहोचल्यास त्यांच्या परिवाराला आरोग्य विभागाकडून एक रुपयाची मदत केली जात नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे डॉक्‍टरांच्या परिवाराला आरोग्य विभागातर्फे सुरक्षाकवच म्हणून तीस लाखांचा विमा देण्याची मागणी महाराष्ट्रात अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांनी केली आहे.

कुटुंबीयांचा विचार व्हावा
मेळघाटात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आदिवासी बांधवांची रात्री-बेरात्री सेवा करावी लागते. अशा वेळेस अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होतो. करिता शासनाने डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांचा विचार करून सुरक्षाकवच म्हणून अस्थायी कर्मचाऱ्यांना तीस लाखांचा विमा देण्याची मागणी मेळघाटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश भालतिलक व डॉ. अभिषेक इंगळे यांनी केली.

loading image
go to top