संतोष आंबेकरने केला डॉक्‍टर तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

नागपूर : एका 23 वर्षीय डॉक्‍टर तरुणीला जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या कुख्यात डॉन संतोष शशिकांत आंबेकर (49) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आंबेकर आणि त्याचा भाचा सध्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहेत. 

नागपूर : एका 23 वर्षीय डॉक्‍टर तरुणीला जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या कुख्यात डॉन संतोष शशिकांत आंबेकर (49) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आंबेकर आणि त्याचा भाचा सध्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी संतोष आणि त्याच्या सहकाऱ्यांवर सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुजरातच्या व्यापाऱ्याची पाच कोटींनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर शुक्रवारी गुजरात येथील एका व्यापाऱ्याची सव्वा कोटींनी फसवणूक केल्याप्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही घटनांचा पोलिस तपास करीत असतानाच डॉक्‍टर तरुणीच्या तक्रारीवरून संतोषवर विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 
पीडित तरुणी ही सेन्ट्रल एव्हेन्यू चौकात राहते. ती 16 वर्षाची असतानाच आंबेकरची तिच्यावर नजर होती. तरुणी ही रस्त्याने ये-जा करीत असताना संतोष हा तिला थांबवून विचित्र इशारे करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचप्रमाणे तिला सातत्याने फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असे. 2015 मध्ये संतोषने तिला आपल्या जाळ्यात ओढले. वेगवेगळ्या बहाण्याने तिला आरोपी हा स्वत:च्या घरी किंवा त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या त्याच्या कार्यालयात नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. ही माहिती कुणालाही सांगितल्यास तिला बदनामीसह सोडणार नसल्याची धमकी देत होता. त्याच्या भीतीपोटी तिने या गोष्टीची कुठेही वाच्यता केली नाही. छळ असह्य झाल्याने तरुणीने शुक्रवारी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी 354(अ), 354(ड), 376(2)(एन), 506(ब) भादंवि, सहकलम 12 पोक्‍सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
दमदाटी करून अत्याचार 
युवती 16 वर्षांची असतानाच डॉन आंबेरकने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला दमदाटी करून मुंबईला नेले. घाटकोपर (मुंबई) येथील हॉटेलमध्ये आणि बंगळुरू येथील अमन वन या रिसॉर्टमध्ये तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या 2015 पासून आंबेकर तिचे लैंगिक शोषण करीत होता. 
निर्भयपणे समोर येऊन तक्रारी द्या 
कुख्यात डॉन आंबेकरवर आतापर्यंत दोन डझनांपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तर अनेकांना जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे अद्यापपर्यंत पोलिस तक्रार देण्याची हिंमत झाली नाही. मात्र, आता गुन्हे शाखेचे नीलेश भरणे, उपायुक्‍त गजानन राजमाने यांनी आंबेकरची कुंडली काढली असून त्याची दहशत समाप्त करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे समोर येऊन तक्रारी द्याव्यात, त्यांना पूर्णपणे संरक्षण दिले जाईल, असे आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don ambekar, rape