"बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथाचे पाच लाखांवर दान

चंद्रशेखर महाजन
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्धांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सने 9 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या दानाला आता संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. बौद्धांच्या संस्कारासाठी उपयुक्‍त असलेला हा ग्रंथ या वर्षी 5 लाख 35 हजारांवर गेला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील बौद्धांच्या घरोघरी हा ग्रंथ दिसत आहे. या वर्षीसुद्धा हा ग्रंथ सर्वांना मिळणार आहे.

नागपूर : दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्धांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सने 9 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या दानाला आता संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. बौद्धांच्या संस्कारासाठी उपयुक्‍त असलेला हा ग्रंथ या वर्षी 5 लाख 35 हजारांवर गेला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील बौद्धांच्या घरोघरी हा ग्रंथ दिसत आहे. या वर्षीसुद्धा हा ग्रंथ सर्वांना मिळणार आहे.

हजारो वर्षे वर्णव्यवस्थेच्या जुलमी व्यवस्थेमध्ये भरडलेल्या अस्पृश्‍यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या धम्मभूमीवर धम्मचळवळ गतिमान व्हावी, याकरिता लाखो बौद्धबांधव विजयादशमीला येथे येतात आणि धम्म उत्सव साजरा करतात. मात्र, गेल्या 63 वर्षांमध्ये धम्म उत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. सुरुवातीला येणाऱ्या बौद्धांसाठी मोठ्या प्रमाणात भोजनदानाची व्यवस्था करण्यात येत होती. दर वर्षी ती करण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्रंथसंपदा विक्रीवर भर देण्यात येत आहे. यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म, शूद्र पूर्वी कोण होते? यासह अनेक ग्रंथांचा समावेश आहे. मात्र, 9 वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सने (बानाई)चे अध्यक्ष पी. एस. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात "बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ दान देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाला दीक्षाभूमीवर मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी 50 हजार ग्रंथांचे दान करण्यात आले. हे 50 ग्रंथ फक्‍त सहा तासांमध्ये दान करण्यात आले. फक्‍त दहा रुपयांत हा ग्रंथ दान करण्यात आला. तेव्हापासून या ग्रंथांची सतत मागणी वाढत आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये 5 लाख 35 हजार अंक प्रकाशित करण्यात आले. त्यांची किंमत 5 कोटी 35 लाख आहे. हा ग्रंथ घरोघरी मोफत जावा, याकरिता पुढाकार घेणारे बानाईचे अध्यक्ष पी. एस. खोब्रागडे यामागील उद्देश सांगतात म्हणतात की, संपूर्ण देश हा बौद्धमय होता. कालानुरूप बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार योग्य न झाल्याने भारतातून हा धम्म लयास गेला. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिल्यानंतर हा धम्म पूर्ण नव्या रूपाने आणि जोमाने भारतात आला. बौद्धांनी धम्माचे पालन कसे करावे, याविषयी 5 वर्षे मेहनत घेऊन बाबासाहेबांनी "बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहिला. शेकडो बौद्ध ग्रंथांचे वाचन, चिंतन केल्यानंतर हा ग्रंथ पुढे आला. मात्र, बाबासाहेबांनंतर बौद्धांनी फक्‍त बाबासाहेबांना स्वीकारले. धम्माकडे दुर्लक्ष केले. यामुळे हा धम्म घरोघरी असला तरी बौद्ध माणूस हवा तसा संस्कारित झाला नाही. याला कारण म्हणजे "बुद्ध आणि त्यांच्या धम्म' या ग्रंथाकडे झालेले दुर्लक्ष. यामुळे समाज संस्कारित करण्यासाठी या ग्रंथाचे दान करण्याचा निर्णय घेतला.
या ग्रंथाचे मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये प्रकाशन करण्यात येत आहे. मराठी भाषेतील ग्रंथाला मोठी मागणी आहे. यानंतर हिंदी ग्रंथाला मागणी होती. देशातील अडीच कोटी बौद्धांच्या घरी हा ग्रंथ जावा, हा यामागील उद्देश आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू यासह दक्षिणेतील राज्यांत मोठी मागणी आहे. "बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचे दान ही चळवळ झाली आहे. उत्तर भारतात बुद्धधम्मात येण्याची मोठी लाट आहे. गुजरात, झारखंड राज्यांत धम्मात येणाऱ्यांची संख्या मोठी असून, त्यांच्या धम्माचे संस्कार व्हावेत, याकरिता या ग्रंथाचे दान करण्यात येत आहे.

बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न "बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ दान करून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. ग्रंथदान ही आता चळवळ झाली आहे. या उपक्रमाचा आदर्श अनेक संघटनांनी घेतला आहे. भारतातील प्रत्येकाच्या घरात हा ग्रंथ असावा, अशी इच्छा आहे. याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-पी. एस. खोब्रागडे, अध्यक्ष, बानाई, नागपूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donate over five lakhs of the book "Buddha and His Dhamma"