esakal | कोविडचा उपचार करताना इतर आजार विसरले तर नाही ना..
sakal

बोलून बातमी शोधा

COMMISSIONAR MEETING

कोरोना विषाणू कोविड -19 च्या उपचारात गुंतलेल्या आरोग्य विभागाकडून इतर आजारावरील उपचारांकडे दुर्लक्ष होता कामा नये. इतर उपचार आणि नियमित लसिकरणाचा कार्यक्रमही सुरू राहिला पाहिजे, असे निर्देस विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बुधवारी (ता.22) जिल्हा व आरोग्य प्रशासनाला दिले.

कोविडचा उपचार करताना इतर आजार विसरले तर नाही ना..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू कोविड -19 च्या उपचारात गुंतलेल्या आरोग्य विभागाकडून इतर आजारावरील उपचारांकडे दुर्लक्ष होता कामा नये. इतर उपचार आणि नियमित लसिकरणाचा कार्यक्रमही सुरू राहिला पाहिजे, असे निर्देस विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बुधवारी (ता.22) जिल्हा व आरोग्य प्रशासनाला दिले.


कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर व त्या अनुषंगाने अंमलात असलेल्या लॉकडानन कालावधीत प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. नियोजन सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ व अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात 27 हजार 496 प्रवाशी आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यात 26 हजार 792 जणांचा अलगीकरणाचा14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 704 जण अजूनही गृह अलगीकरणात आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी पापळकर यांनी कोरोना अनुषंगाने लागू झालेल्या लॉकडाउन कालावधीत जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यात अकोला शहरात बैदपूरा व अकोट फैल, पातूर व बाळापूर असे चार प्रतिबंधित क्षेत्र आहे. येथे 150 पथकांची नियुक्ती करून14600 घरांमधील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली, या तपासणी अंती संदिग्ध लक्षणे आढळलेल्या 266 जणांना अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. बैठकीनंतर विभागीय आयुक्त यांनी कोवीड चाचणी प्रयोगशाळा येथेही भेट देऊन माहिती जाणून घेतली.


याकडेही वेधले लक्ष
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 132 खाटांची व्यवस्था.
-आयकॉन हॉस्पिटलमध्ये 150 खाटा
- ओझोन हॉस्पिटलमध्ये 100 खाटा
- सौम्य लक्षणे आढळणाऱ्या संदिग्ध रुग्णांसाठी सहा कोविड हेल्थ सेंटर
- त्यात 370 खाटांची व्यवस्था
- संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यासाठी जिल्ह्यात 14 कोवीड केअर सेंटर्स
-त्यात 1150 जणांची व्यवस्था.
- जिल्ह्यात 25 ठिकाणी स्थलांतरीत परप्रांतिय मजुरांचे आश्रयस्थाने
- येथे 2048 जणांनी आश्रय घेतला आहे.
-स्वयंसेवी संस्थांची जिल्ह्यात 25 सामूहिक स्वयंपाक गृहे
-त्यातून 2039 लोकांना जेवण पुरविण्यात येत आहे
- दहा शिवभोजन थाळी केंद्र सुरू झाले
- त्यामार्फत 1600 हून अधिक थाळ्यांचे जेवण गरजूंना दिले जात आहे
- काळाबाजारी रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर पथक
- लॉकडाउन काळात विविध विभागांमार्फत एकूण 2977 परवानग्या


पाणीटंचाईची कामे प्राधान्याने करा
उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात काटेकोर नियोजन करा. ऐनवेळी कोठेही पाणीटंचाई भासू नये यासाठी आधीपासूनच उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.