esakal | भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला

भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील राजकारणात बुधवारी एक मोठी राजकीय घडामोड झाली. विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. या सोहळ्याला प्रांताध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे बुधवारी हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. (Dr.-Ashok-Jivtode-joins-NCP)

चंद्रपूर आणि विदर्भातील  शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे डॉ. जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक असलेला एक परिचित मोहरा ओढून घेतल्याचे बोलले जात आहे. डॉ. जीवतोडे ३५ वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. १९६७ मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून त्यांचे वडील दिवंगत श्रीहरी जीवतोडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे बंधू दिवंगत संजय जीवतोडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाशी जुळले होते.

हेही वाचा: Woman Power : विदर्भात एका विभागीय आयुक्तासह पाच महिला जिल्हाधिकारी

डॉ. अशोक जीवतोडे यांची भाजपशी जवळीक होती. त्यांनी भाजपमध्ये कधीच अधिकृत प्रवेश केला नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत एका प्रचारसभेत त्यांनी मंचावर उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने भाजपला मोठा धक्का पोहोचला आहे. यादरम्यान त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत सुद्धा सक्रिय सहभाग घेतला. त्याचवेळी ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम हाती घेतले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ते राष्ट्रीय समन्वयक आहेत.

नागपूर, दिल्ली, हैदरबाद आदी ठिकाणी त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील शिबिराचे आयोजन केले. ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबर २०१८ रोजी मोर्चा काढला. त्यात डॉ. जीवतोडे यांनी इतर ओबीसी नेत्यांसोबत मोर्चाचे नेतृत्व केले. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था फारशा चांगली नाही. डॉ. जीवतोडे यांच्या रूपाने आर्थिक ताकद आणि लोकसंग्रह असलेला नेता मिळाला. त्यामुळे पक्षाला पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात चांगले दिवस येतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

(Dr.-Ashok-Jivtode-joins-NCP)

loading image