...तर एमआयएमशी युती करण्यापासून बहुजन आघाडी राहणार 'वंचित'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून आघाडीला एकमेव यश मिळाले. इतर ठिकाणी मात्र एमआयएमला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीला फारसा लाभ झाल्याचे दिसून आले नाही.

अकोला : वंचित बहुजन आघाडीचा घटक असलेल्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने ‘वंचित’मध्ये फूट पडली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी अद्यापही आघाडीबाबत सकारात्मक असून, जोपर्यंत खासदार असदुद्दीन ओवैसी त्यांची भूमिका जाहीर करीत नाही, तोपर्यंत आघाडी कायम असल्याचे आम्ही मानतो, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी शुक्रवारी (ता.6) ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  

लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीची घोषणा झाल्यानंतर एमआयएमने वंचित बहुजन आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून आघाडीला एकमेव यश मिळाले. इतर ठिकाणी मात्र एमआयएमला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीला फारसा लाभ झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच वंचित बहुजन आघाडीपासून एमआयएम वेगळे होण्याची चर्चा रंगू लागली होती.

त्यानंतरही विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षात चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवारी औरंगाबादचे खासदार व महाराष्ट्रातील एमआयएमचे प्रमुख इम्तियाज जलील यांनी आघाडी तुटल्याचे जाहीर करून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते एमआयएमसोबतच्या आघाडीबाबत अद्यापही सकारात्मक असल्याचे सांगत आहेत. आघाडीबाबतची भूमिका खासदार असदुद्दीन ओेवैसी जाहीर करीत नाही, तोपर्यंत एमआयएम आघाडीचा घटक राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात 17 जागांसाठी सुरू होती चर्चा  
एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडीला 17 जागांची यादी दिली होती. त्यानुसारच एमआयएमसोबत चर्चा सुरू असताना आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय खासदार जलील यांनी जाहीर केला. त्यामुळे आघाडीची चर्चा थांबली आहे.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू असतानाच आज खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याची घोषणा केली. एकीकडे आदरणीय ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू असताना खासदार जलील यांनी घेतलेली भूमिका दुर्दैवी असून, त्यांच्यात आणि ओवैसींमध्ये कम्युनिकेशन गॅप असल्याचे दिसते.

युती संदर्भात आम्ही ओवैसी यांच्याशी चर्चा करतोय. त्यामुळे जो पर्यंत स्वतः खासदार ओवैसी समोर येऊन या संदर्भात भूमिका जाहीर करत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील युती कायम आहे, असे आम्ही मानतो.
- प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Dhairywardhan Pundkar comment on alliance of Vanchit and MIM