esakal | डॉ. सतीश गोगुलवार समितीच्या तपासणीत ढिसाळ आरोग्यसेवा उघड
sakal

बोलून बातमी शोधा

कोरची (जि. गडचिरोली) : ग्रामीण रुग्णालयाची तपासणी करताना डॉ. गोगुलवार समितीचे सदस्य.

डॉ. सतीश गोगुलवार समितीच्या तपासणीत ढिसाळ आरोग्यसेवा उघड

sakal_logo
By
नंदकिशोर वैरागडे

कोरची (जि. गडचिरोली) : उच्च न्यायालयाने आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या डॉ. सतीश गोगुलवार आरोग्य समितीने केलेल्या पाहणीत तालुक्‍यातील ढिसाळ आरोग्यसेवा उघडकीस आली आहे.
उच्च न्यायालयाने आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या डॉ. सतीश गोगुलवार यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने कोरची तालुक्‍यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राला 22 ऑगस्टला अनपेक्षित भेट दिली. दीनानाथ वाघमारे यांनी नागपूर उच्च न्यायालयात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील कमतरतेसंबधी याचिका टाकली. त्याला शासनातर्फे सर्व ठिक असल्याचे उत्तर दिले. त्याची पाहणी करून सध्या स्थिती काय आहे, याची माहिती सादर करण्यासाठी नागपूर उच्च न्यायालयाने डॉ. सतीश गोगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली. यात डॉ. मनोहर मुद्देशवार, डॉ. फुलचंद मेश्राम यांची शासनातर्फे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 22 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय कोरची व प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा येथे समितीने अनपेक्षित भेट दिली. ग्रामीण रुग्णालयात साफसफाई नाही, हजारो रुपये खर्च करून सोलर युनिट खरेदी केले ते निरुपयोगी पडून आहेत. दोनच डॉक्‍टरांवर ग्रामीण रुग्णालयाचा भार आहे. ज्या औषधांची गरज आहे त्यांची कमतरता आहे. कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात तालुक्‍यातील पन्नास हजार लोकसंख्या असून लोकसंख्येच्या आधारावर ग्रामीण रुग्णालयांमध्ये ग्रामीण रुग्णालय अधीक्षकाची, बालरोगतज्ज्ञ,, स्त्री रोग तज्ज्ञ, डॉक्‍टरांची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे. या परिसरात कुपोषण व बालमृत्यू, माता मृत्यूंची संख्या अधिक प्रमाणात असून तालुका मुख्यालयापासून जिल्हा मुख्यालय आहे 120 किलोमीटर आहे.
त्यामुळे या परिसरातील लोकांना चांगल्या पद्धतीचे आरोग्यसेवा मिळावी यासाठी तत्काळ डॉक्‍टर नियुक्ती करून देण्याची शिफारस करणार असल्याचे कमिटीचे अध्यक्ष डॉ. गोगुलवार यांनी सांगितले. त्यानंतर समिती प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा येथे दाखल झाली. तिथे गेल्यानंतर समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज असूनही या ठिकाणी एकही डॉक्‍टर नाहीत, हे ऐकून समितीच्या सदस्यांनी आरोग्य केंद्राची संपूर्ण तपासणी केली. त्यात बाह्यरुग्ण कार्य वॉर्डमध्ये कॅरम बोर्ड लावलेला होता. प्रसूती वॉर्ड कुलूपबंद होते, तर अतिदक्षता वॉर्डमध्ये धूळ साचली होती. रुग्ण आल्यानंतर उपचार करण्यासाठी आवश्‍यक साहित्य नव्हते. भेटीच्या वेळी फक्त 1 एएनएम व लॅब टेक्‍निशियन उपस्थित होते. हे आरोग्य केंद्र कोरचीवरून बोटेकसा येथे स्थलांतरित झाल्यापासून आज तारखेपर्यंत फक्त दोन महिलांचीच प्रसूती करण्यात आली. ही इमारत कर्मचाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठीच उपयोगात येत असल्याचे समितीला निदर्शनास आले. या केंद्रात कुटुंबनियोजनाची आजपर्यंत एकही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. 

loading image
go to top