गडचिरोलीत नक्षल्यांच्या हालचालीवर आता ड्रोन ठेवणार नजर...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

मागील दोन महिन्यांत लॉकडाउनचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी एटापल्ली, कोरची, भामरागड व धानोरा तालुक्‍यात हिंसक घटना घडवून आणल्या. हा धोका ओळखून तसेच पोलिस खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून दुर्गम भागातील पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून ड्रोनद्वारे नक्षलवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

गडचिरोली : नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्याकरिता शासनातर्फे पोलिस ठाणे आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत; तर ड्रोनद्वारे तीन किलोमीटर परिसरामध्ये लक्ष ठेवण्यात येणार आहे. नक्षल कारवाया रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

 

नक्षल घडामोडीत अतिसंवेदशील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षात चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. यात नक्षल संघटनेचे काही पदाधिकारी व कमांडरचाही समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील काही नक्षल दलम संपुष्टात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांत नक्षलवादी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

 

चळवळीला यंदा आर्थिक फटका

छत्तीसगड राज्यातून आलेल्या नक्षलवाद्यांनी नव्याने मोर्चा बांधणीचे काम हाती घेतल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. मागील दोन महिन्यांत लॉकडाउनचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी एटापल्ली, कोरची, भामरागड व धानोरा तालुक्‍यात हिंसक घटना घडवून आणल्या. वाहनांच्या जाळपोळीने दुर्गम भागातील रस्त्यांची कामे रखडली; तर तेंदूपत्ता हंगामात नक्षलवाद्यांना पुरवण्यात येत असलेली जवळपास तीन कोटींवर रोकड पोलिसांनी जप्त केली. यामुळे नक्षल चळवळीला यंदा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे.

जाणून घ्या  : प्रेयसीच्या घरातच प्रियकर होता महिनाभर लपून, काय असावे कारण?

पाऊस नसल्याने नक्षलवादी सक्रिय

नक्षलवादी डोंगर व घनदाट जंगलात वास्तव्याला राहून कारवाया घडवून आणतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत नदी, नाल्यामुळे त्यांना अडथळा येतो. यामुळे ते या दिवसांत भूमिगत होतात. मात्र, पावसाळ्याआधी एखादी मोठी घटना घडविण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. सध्या पावसाळा सुरू झाला असला; तरी पावसाचा अद्याप जोर नाही. त्यामुळे नक्षलवादी सक्रिय आहेत. हा धोका ओळखून तसेच पोलिस खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून दुर्गम भागातील पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून ड्रोनद्वारे नक्षलवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The drone camera will now keep an eye on the movement of Naxals in Gadchiroli