कोरोनाने आणले बालपणीच्या मित्रांना एकत्र अन् सुरू झाले वेगवेगळे उपक्रम... 

श्रीकांत पेशट्टीवार
Monday, 31 August 2020

चंद्रपूर शहरातील पंधरा ते सोळा युवक नोकरीनिमित्त पुण्या, मुंबईत वास्तव्यास होते. लॉकडाउनमुळे हे युवक स्वगावी परतले. घरच्या घरी राहून कंटाळलेल्या या युवकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ते एकत्रही आले. त्यातून ‘नमस्ते चांदा क्‍लब’ची स्थापना केली. याच क्‍लबच्या माध्यमा

चंद्रपूर ः कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशभर लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे अनेकांनी घरची वाट धरली. पुणे, मुंबईत मोठ्या पदांवर नोकरीवर असलेले लोक आपआपल्या घरी परतले. त्यातून शालेय जीवनापासून दुरावलेले मित्र एकत्र आले. त्यांनी एकत्र येत ‘नमस्ते चांदा क्‍लब’ स्थापन केले. याच क्‍लबच्या माध्यमातून दुरावलेल्या या बालमित्रांनी समाजचळवळ सुरू केली. दर रविवारी एकत्र येत वेगवेगळे उपक्रम हे बालमित्र राबवीत आहेत. 

मार्च महिन्यात कोरोना विषाणूने देशात हातपाय पसरले. प्रकोप वाढत गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. लॉकडाउनच्या काळात मोठ्यमोठ्या कंपन्यांची कामे ठप्प पडली. अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ शिवाय पर्याय उरला नाही. लॉकडाउनचा काळ वाढत गेल्याने तेही काम बंद झाले. 

चंद्रपूर शहरातील पंधरा ते सोळा युवक नोकरीनिमित्त पुण्या, मुंबईत वास्तव्यास होते. लॉकडाउनमुळे हे युवक स्वगावी परतले. घरच्या घरी राहून कंटाळलेल्या या युवकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ते एकत्रही आले. त्यातून ‘नमस्ते चांदा क्‍लब’ची स्थापना केली. याच क्‍लबच्या माध्यमातून बालपणीचे हे मित्र दर रविवारी वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे. याची सुरुवातच प्रदूषित चंद्रपुरात वृक्षारोपणाने झाली. 

भिवापूर वॉर्डात असलेल्या साईमंदिरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कडुनिंब, गुलमोहर यांसह अन्य झाडांचे त्यांनी रोपण केले. इतकेच नाही तर या झाडांचे संवर्धन करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. पुण्या, मुंबईत साफसफाईला महत्त्व दिले जाते. त्याच धरतीवर या युवकांनी रविवारी (ता. ३०) पठाणपुरागेट ते आरवट मार्गावरील कचऱ्याची साफसफाई केली. जवळपास पंधरा थैली कचरा गोळा केला. हा कचरा चंद्रपुरातील कचरा डेपोत आणून टाकला. यानंतरही वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा मानस या बालमित्रांनी व्यक्त केला. 

‘नमस्ते चांदा क्‍लब’मध्ये गोविल मेहरकुरे, हितेश कोटकर, प्रीतम खडसे, वैभव थोटे, मयुर निखारे, सागर महाडोळे, महेश सोमनाथे, अनिकेत सायरे, जगदीश राचलवार, यतीश मेश्राम, अभिजित इंगोले, चारूल कोटकर, गजराज आंबोरकर, प्रवीण पाटील, रोशन कोंकटवार, सिद्धार्थ नागरकर यांचा समावेश आहे. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lockdown childhood friends came together and started various activities...