
नागरिकांना मोठ्या अंतराचा वळसा घेऊन तेलंगणा राज्यात जावे लागत आहे. नदीच्या पात्रातूनही त्यांना १५ ते १६ किलोमीटर चालून जावे लागत आहे. या बॅरेजचे गेट बंद असल्यामुळे लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कुलूप उघडून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी आहे.
अंकिसा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्याला भरभरून समृद्धी आणि महाराष्ट्रातील सिरोंचा तालुक्याला पुराचे संकट देणारा येथील महाकाय मेडीगड्डा प्रकल्प आता येथील नागरिकांचीही अडवणूक करू लागला आहे.
या धरणावरूनच तालुक्याच्या अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. पण, आता येथे फाटक लावून त्याला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे येथून दैनंदिन कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महाराष्ट्र सरकारचे नुकसान होत असतानाही तत्कालीन भाजप सरकारच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. अनेक लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशा वल्गना केल्या होत्या. पण, सिरोंचातील अनेक शेतकऱ्यांची शेती, घरे पाण्यात बुडतील हे माहिती असतानाही मोठ्या चतुराईने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.
या प्रकल्पाचा तालुक्यातील नागरिकांना कोणताही विशेष लाभ होत नाही. उलट या धरणाने येथील नागरिकांचा रस्ता अडवला आहे. या मेडीगड्डा बॅरेजच्या गेटला कुलूप लावून असल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील सर्व गावांतील लोकांच्या कामाच्या समस्या वाढल्या आहेत. आधीच कोरोनामुळे सर्व लोकांचे दैनंदिन जीवन कठीण झाले आहे. येथील अतिदुर्गम भागातील सोमनपल्ली, पातागुडम, असरअल्ली, टेकडा, यासारख्या गावांतील नागरिकांना नेहमीच विविध रोजगार व मजुरीसाठी या बॅरेजला पार करून जावे लागते. त्याशिवाय त्यांची अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज पूर्ण होत नाही. मात्र, येथील नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही या बॅरेजच्या गेटचे कुलूप अद्याप उघडण्यात आले नाही.
जाणून घ्या : मुलाला मोबाईल खेळायला देणे वडिलांना भोवले; ऐनीडेस्कच्या माध्यामातून नऊ लाखांनी फसवणूक
त्यामुळे नागरिकांना मोठ्या अंतराचा वळसा घेऊन तेलंगणा राज्यात जावे लागत आहे. सोमनपल्ली, पातागुडम यासारख्या गावांतील लोक कामासाठी नदीच्या पात्रातून पायदळ जात जीवघेणा प्रवास करत आहेत. नदीच्या पात्रातूनही त्यांना १५ ते १६ किलोमीटर चालून जावे लागत आहे. या बॅरेजचे गेट बंद असल्यामुळे लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. गेट बंद असल्यामुळे त्यातून कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. लोकांनाही जाण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून कुलूप उघडून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
अवश्य वाचा : घरी सरणाची तयारी अन् मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
मेडीगड्डा प्रकल्प तेलंगणा राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तेथील भूमी सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यासाठी संकटेच घेऊन आला आहे. या प्रकल्पाचे पाणी तेलंगणाला मिळते. त्यासाठी तेलंगणा सरकारने मोठमोठ्या पाइपलाइन, उपसा यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने आपल्या वाट्याच्या पाण्यासाठीही विशेष काही केले नाही. शिवाय या प्रकल्पामुळे पुराचा धोका असल्याने फायद्यापेक्षा तोटाच अधिक होत आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)