धक्कादायक! एका तपानंतर ‘रामाळा’ तलावात ‘जलपर्णी’ने काढले डोके वर; जलचर प्राणी धोक्यात

file photo
file photo

चंद्रपूर : शहरातील एकमेव प्राचीन रामाळा तलावाला तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा जलपर्णी या वनस्पतीने विळखा घातला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच तलावातील जलचरांच्या जिवांना धोका होईल, अशी चिंता पर्यावरणप्रेमींना वाटत आहे.

औद्योगिकीकरणामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे अनेक तलाव नागरी वस्त्यांनी गिळंकृत केले. आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही आता अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र, या तलावामुळे शहरातील काही भागातील भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होत आहे.

येथे सौंदर्यीकरणासाठी तलावाचा मोठा भाग बुजविण्यात आला आहे. उर्वरित तलावात बाराही महिने पाणी असते. या तलावावर २००८ साली पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. तेव्हा उद्योगांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात आली. त्यासाठी आधी तलाव कोरडा करण्यात आला. त्यानंतर अनेकदा जलपर्णीने आक्रमण केले. प्रत्येक वेळी हातपाय पसरण्यापूर्वीच मच्छिमार सोसायटीने जलपर्णी बाहेर काढली.

घाणपाणी तलावात साचले

त्यामुळे मागील बारा वर्षांत ही वनस्पती वाढली नाही. यावर्षी तलावाच्या खोलीकरणासाठी उन्हाळ्यात पाणी सोडण्यात आले. परंतु, खोलीकरण झाले नाही. पावसाळ्यात घाण पाणी तलावात साचले आणि जलपर्णीने आपले हातपाय पसरले. ही वनस्पती घाण पाण्यातच वाढते. यावेळी तिला पोषक असे पाणी मिळाल्याने तलावाचा बहुतांश भागात आता ती पसरली आहे.

जलपर्णीमुळे तलावाला धोका

जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्‍सिजनची पातळी कमी होते. सूर्यप्रकाश पाण्यात पोहचत नाही. विशेष म्हणजे, या वनस्पतीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. आता पुन्हा जलपर्णी तलावातून बाहेर काढण्यासाठी तलाव कोरडा करावा लागणार आहे. मच्छिमार सोसायटीने या मस्त्यबीज टाकले आहे. त्यांचीही वाढही झाली आहे. जलपर्णी काढण्यासाठी पाणी सोडले तर त्यांचे मोठे नुकसान होईल. पाणी सोडले नाही, तर संपूर्ण तलावावर जलपर्णी पसरेल, असे दुहेरी संकट प्रशासनसमोर उभे ठाकले आहे. यासंदर्भात इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. जलपर्णी लवकरात लवकर पाण्याबाहेर काढावा, अन्यथा तलाव नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सांडपाण्याचे केंद्र

रामाळा तलाव शहरातील सर्वांत मोठे सांडपाणी जमा होण्याचे केंद्र आहे. शहरातील मुख्य मच्छीनाल्याचा एक भाग झरपट नदीला मिळतो. तो सरळ तलावात येतो. त्यामुळे दूषित पाण्यावर जगणारी वनस्पती वाढते. त्यामुळे तलावाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी आणि विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यावर वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट बसविण्याची गरज आहे. तलावालगतच्या रेल्वे मालधक्‍क्‍यावरून रासायनिक खते चढ-उतार होते. जमिनीवर पडणारे युरिया, सल्फेट सारखी खते पावसाच्या पाण्यासोबत वाहून तलावात येत असतात. गणेश आणि दुर्गा मूर्ती विसर्जनामुळे तलावात मोठा गाळ साचला आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com