शिक्षण विभाग वाऱ्यावर

प्रकाश गुळसुंदरे
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

परतवाडा(अमरावती) : जिल्ह्यातील शिक्षण विभाग ढेपाळला असून कायम अधिकारी नसल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. जिल्ह्यावरील शिक्षणाधिकारी तर तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे शाळा व त्यातील शिक्षणाच्या दर्जावर कुणाचे नियंत्रण नसून शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत असल्याची ओरड होत आहे.

परतवाडा(अमरावती) : जिल्ह्यातील शिक्षण विभाग ढेपाळला असून कायम अधिकारी नसल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. जिल्ह्यावरील शिक्षणाधिकारी तर तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे शाळा व त्यातील शिक्षणाच्या दर्जावर कुणाचे नियंत्रण नसून शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत असल्याची ओरड होत आहे.
जिल्ह्यात जवळपास 2537 शाळा आहेत. या शाळांवर देखरेखसह वचक ठेवण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी असतात. मात्र सध्या जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. काही कार्यरत उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षणाधिकाऱ्यांचा अतिरिक्त प्रभार आहे. तर चौदा तालुक्‍यांत फक्त तीनच गटशिक्षणाधिकारी असून तब्बल अकरा गटशिक्षणाधिकारी प्रभारावर आहेत. जवळपास 34 विस्तार अधिकारी व 87 केंद्रप्रमुख यांची पदे जिल्हाभर रिक्त असल्यामुळे अनेक तालुक्‍यांचा कारभार प्रभारींवरच सुरू असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शाळांना भेटी दिल्या जात नसल्याने अनेक शाळांमध्ये सारे काही ऑलवेल सुरू असल्याचा आरोप होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अनेक अधिकाऱ्यांची पदे भरली जात नसल्याने एकच विस्ताराधिकारी तथा केंद्रप्रमुखाला अनेक वरिष्ठ पदांसह स्वतःची कामे सांभाळावी लागतात. यातून कामे खोळंबली असल्याचे बोलले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कमालीचे दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांना एकावेळी अनेक पदांचा प्रभार दिल्याने एक ना धड भाराभर चिंध्या, अशी या विभागाची गत झाली आहे. लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागातील वरिष्ठांनी याकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.

पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. पदे भरणेही आवश्‍यक आहे.
-ए. एस. पेंडोर, शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग.

शासनाच्या अनास्थेमुळे प्राथमिक शिक्षण दुरवस्थेकडे जात आहे. शिक्षकांसह अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदांमुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. जागा भरण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
-जयंत देशमुख, शिक्षण सभापती जि. प. अमरावती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education Department winds up