
गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्थानी पुढे यावे - शरद पवार
अमरावती : समाजातील गरीब तसेच आदिवासी मुला-मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थानी समोर आले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची स्वप्नपूर्ती होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (ता. १०) केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थाव्दारे निर्मित श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार किरण सरनाईक, आमदार देवेंद्र भुयार, आमदार अमोल मिटकरी, आमदार संदीप बाजोरिया यांच्यासह अन्य उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, आज कृषी महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गरिबांना शिक्षण अवघड झाले असून गरीब मुलामुलींना या महाविद्यालयांमधून शिक्षण घेण्याची संधी संस्थांनीच उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यासाठी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेत भाऊसाहेबांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. त्यासाठी एक कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. या निधीच्या व्याजाच्या पैशांतून संस्थेच्या कृषी व वैद्यकीय महाविद्यालयातून प्रत्येकी दोन मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तत्पूर्वी, शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृत वैदिक धर्ममिमांसा या ग्रंथाचे तसेच शिवसंस्था त्रैमासिकचे विमोचन करण्यात आले. संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची तसेच भविष्यातील योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक नरेशचंद्र ठाकरे यांनी केले. संचालन डॉ. किशोर फुले यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप इंगोले यांनी केले. यावेळी कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. रामचंद्र शेळके, अॅड. गजानन पुंडकर, हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, शेषराव खाडे यांच्यासह शिवपरिवारातील सदस्य उपस्थित होते.
कामगारांच्या प्रश्नांवर बैठक
फिनले मील कामगारांच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीला शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. सुरेखा ठाकरे यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संतोष महात्मे, प्रवीण भुजाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
माजी राष्ट्रपतींची घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची त्यांच्या देवीसदन या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास २५ मिनिटे पाटील कुटुबियांसमवोत शरद पवार यांनी चर्चा केली.
Web Title: Education Institutions Come Forward For Education Of Poor Students Ncp Sharad Pawar Amravati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..