तब्बल २५ वर्षानंतर सूतगिरणी सुरू करण्याच्या हालचाली

शशांक देशपांडे
Friday, 23 October 2020

गेल्या २५ वर्षांपासून बंदस्थितीत असलेल्या दर्यापुरातील श्रीसंत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी व अंजनगावातील श्री अंबा सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या हालचालींना वेग आला आहे.

दर्यापूर : गेल्या २५ वर्षांपासून बंदस्थितीत असलेल्या दर्यापुरातील श्रीसंत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी व अंजनगावातील श्री अंबा सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या हालचालींना वेग आला आहे.

आमदार बळवंत वानखडे यांच्या पुढाकाराने नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक विधानभवनात झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री यशोमती ठाकूर, राजेंद्र पाटील यड्रवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील संत गाडगेबाबा सह सूतगिरणी मर्या. दर्यापूर आणि अंबा सहकारी साखर कारखाना या दोन्ही सहकारी संस्था पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. दर्यापूर विधानसभा मतदारसंघात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे तसेच अंजनगाव तालुक्‍यात सिंचनाचे पाणी उपलब्ध आहे. सदर सूतगिरणी पूर्ववत सुरू झाल्यास त्याचा फायदा मतदारसंघातील शेतकऱ्यांना होऊन रोजगारनिर्मिती होण्यास मोठी मदत होणार आहे.

वाचा - टाळेबंदीने मारले, कुक्कुटपालनाने तारले; दोन हजार सातशे महिलांना रोजगार

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने अंबा साखर कारखाना कायनेटिक पेट्रोलियम कंपनी चेंबूर या कंपनीस पूर्ववत सुरू करण्याच्या अटीवर विकला आहे. परंतु सदर कंपनीमार्फत कारखाना आजपर्यंत बंद अवस्थेत ठेवला आहे. सदर कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश नानाभाऊ पटोले यांनी दिले. तसेच संत गाडगेबाबा सूतगिरणी दर्यापूर पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने वस्त्रोद्योग विभाग व दि महाराष्ट्र सहकारी बॅंक यांच्या सहकार्याने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

आणखी वाचा - वांगेपल्लीत जप्त केली 7 लाख 78 हजारांची दारू; बंदीला झुगारून नवरात्रोत्सवातही तस्करी

खरेदी-विक्रीचे कमिशनचे पैसे आणि अन्य प्रलंबित देयके तातडीने अदा करण्यात यावे, शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी-विक्री संस्थेद्वारे खरेदी करण्यात यावा, अन्य कुठल्याही संस्थेला खरेदीचे अधिकार देऊ नये, याबाबतसुद्धा आमदार वानखडे यांनी मागणी केली. या बैठकीस सहकार, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव, आयुक्त पणन, आयुक्त साखर, एमएच बॅंकेचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आदी अधिकारी उपस्थित होते.
संपादन - नरेश शेळके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Effort to reopen Cotton mill after 25 years