फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 September 2019

नागपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू, यासाठी शक्‍य ते संपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात दिली.

नागपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू, यासाठी शक्‍य ते संपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात दिली.

महात्मा फुले शिक्षण संस्थेतर्फे माळी समाजाच्या समस्यांचा लोकजागर करण्यासाठी आज सुरेश भट सभागृहात अखिल माळी समाज महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या वेळी नितीन गडकरी उद्गाटक म्हणून बोलत होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, स्वागताध्यक्ष प्रा. अरुण पवार, ओबीसी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार वसंतराव मालधुरे, गजानन ढोणे, कृष्णराव इंगळे, किशोर कन्हेरे व्यासपीठावर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले की, समाजाच्या विकासावर सर्वच बोलतात. पण, विकास म्हणजे काय यावर कुणीच बोलत नाही. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे मॉडेल, व्हिजन तयार होऊन रोडमॅप निश्‍चित व्हावा. माळी समाजात ज्ञानी, क्षमता असणारे अनेकजण आहेत त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली तरच महात्मा फुले यांचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

केशवप्रसाद मौर्य म्हणाले की, समाजाच्या एकजुटतेमुळेच उत्तर प्रदेशात लक्षणीय यश मिळविता आले. महाराष्ट्रातही लवकरच निवडणुका होत आहेत. अशावेळी अनेकजण येऊन तुम्हाला भ्रमित करू शकतील. पण, आपण उगवत्या सूर्याला प्रणाम करणारे लोक आहोत. योग्य हवा ओळखली तरच मनातील अपेक्षा पूर्ण होऊन यशसिद्धी नक्कीच साधता येईल. माळी समाज हे माझे कुटुंब आहे, कुटुंबात येऊन आनंद झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. अरुण पवार यांनी तर संचालन डॉ. मंजूषा सावरकर यांनी केले.

"आरक्षण असते तर मीसुद्धा बाबू असतो'
आरक्षण नसल्यामुळेच आज मी इथवर पोचलो आहे अन्यथा बाबू झालो असतो, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. शोषितांना आरक्षण मिळावे. परंतु, आरक्षण मिळालेल्यांचा विकास झाला नाही. सर्वाधिक प्रमाणात आरक्षण घेणाऱ्या समाजाचा विकास झाला असेही नाही. नरेंद्र मोदींनी कधीही मागास असल्याचे सांगितले नाही. जॉर्ज फर्नांडिस, इंदिरा गांधी यांनाही जात सांगावी लागली नसल्याचे ते म्हणाले. अधिक मंत्री असणाऱ्या समाजाचा विकास कमी होतो हा व्यावहारिक अनुभव असल्याचेही त्यांनी भाषणादरम्यान सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts to get married couple to Bharat Ratna