सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यात; राज्यातील ४५ हजार सहकारी संस्था, आराखडा तयार करण्याचे प्राधिकरणाचे आदेश

चेतन देशमुख
Sunday, 17 January 2021

सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. काही संस्थांचा कार्यकाळ हा काही महिन्यांत पूर्ण होणार आहे.

यवतमाळ : कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे बाजार समित्या, विविध कार्यकारी संस्था, पतसंस्थांसह राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. या निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया जानेवारी २०२१ पासून सुरू केल्या जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यांचा निवडणूक आराखडा तयार करण्याचे आदेश सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विदर्भच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. काही संस्थांचा कार्यकाळ हा काही महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे या सर्व संस्थांचा निवडणूक कार्यक्रम एकत्रित लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सहकारामधील काही संस्थांचा कार्यकाळ संपला होता. कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे शासनाने मुदतवाढ दिली होती. निवडणूक घेण्यासंदर्भात मर्यादा आणल्या होत्या. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाही. राज्य शासनाने 'मिशन बिगीन अगेन'ची प्रक्रिया सुरू केली आहे. टप्प्याटप्प्यात सर्वच क्षेत्र सुरळीत केले जात आहे. जिल्ह्यात नुकतीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक झाली. त्यानंतर ९२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीही मतदान झाले. त्यामुळे आता सहकार क्षेत्रात संस्थांना दिलेली मुदतवाढ पूर्ण होत असतानाच प्राधिकरणाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्ह्यात या वर्षभरात जवळपास सहाशेवर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच 'जिल्हा निवडणूक आराखडा' तयार करण्याचे आदेश प्राधिकरणाचे आहेत. न्यायालयीन आदेश, निवडणूक प्रक्रियेतील टप्पा, संचालक मंडळ मुदत संपल्याचा दिनांक आदी बाबी विचारात घेऊन सहा टप्प्यांचा समावेश असलेला निवडणूक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. १८ जानेवारी २०२१ पासून निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहेत. 

प्रथम टप्प्यात यांना वगळले 

आराखड्यातील प्रथम टप्प्यात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुधारित कार्यक्रमानुसार घेण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहे. असे असले तरी २५० व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून इतर सहकारी संस्थांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम लवकरच प्रसिद्ध होणार आहे. 

दिग्गजांच्या संस्थांच्या निवडणुका 

सहकार क्षेत्रावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची मजबूत पकड आजही कायम आहे. नुकत्याच झालेल्या अनेक ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक तसेच मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत याचा प्रत्यय आला आहे. येत्या काळात सहकारात पुन्हा निवडणुका होणार आहेत. त्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या कार्यक्षेत्रातील संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे या नेत्यांची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. या सहकारी संस्था ताब्यात ठेवून सहकारातील राजकारण आपल्या हातात ठेवण्यासाठी प्रमुख नेत्यांमध्ये 'घमासान' होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections of about 45 thousand co operative societies in the state were postponed