राज्यातील साडेतीन हजार एसटी कर्मचाऱ्यांना पावला"बाप्पा'! वाचा नेमके काय

bus stand
bus stand

यवतमाळ : कोरोनाने अनेकांना बेरोजगार केले. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणाऱ्यांमध्ये खाजगी क्षेत्रासह महामंडळांचाही समावेश आहे. एसटी महामंडळात सरळ सेवाभरतीने गेल्या वर्षी सेवेत सामावून घेतलेल्या राज्यातील जवळपास साडेतीन हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची सेवा एसटी महामंडळाने तात्पुरती खंडित केली होती. या निर्णयाने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता एसटी महामंडळाने स्थगित केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना "बाप्पा' पावला आहे.

कोरोनामुळे २३ मार्चपासून एसटी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने एसटीचे दरमहा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. या आर्थिक नुकसानामुळे एसटीने मे महिन्यात कर्मचाऱ्यांना केवळ ५० टक्‍केच वेतन दिले. २०१९ मध्ये सरळ सेवेने राज्यात जवळपास आठ हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी ४,५०० पदांची भरती झाली. त्यातील अनेक उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे.

कोरोनामुळे गेले सहा महिने प्रवासी सेवा ठप्प होती. मात्र, आता राज्यभरात प्रवासी सेवा सुरू झाली आहे. पुन्हा सुरळीत वाहतूक सुरु होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच सरळ सेवा भरतीने २०१९ मधील चालक तथा वाहक पदातं नेमणुका देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. यात साडेतीन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. या निर्णयामुळे कामगारांत असंतोष दिसून आला. संघटनांनी या निर्णयाबाबत आवाज उठविल्याने फेरविचार करण्यात आला. परिणामी आता एसटी महामंडळांचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी गुरुवारी (ता. तीन) सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदांमध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविली आहे.

या निर्णयामुळे साडेतीन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती स्थगित केल्यानंतर परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनीही कोणाचेही नुकसान होणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार नवे आदेश निर्गमीत झाले आहेत. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वाचा - Video : काय म्हणता? आंतरराज्यीय सीमेवर खंदक!

न्याय मिळवून देणारच
२०१९ मध्ये चालक व वाहकपदाची भरती करताना एसटी महामंडळाने आवश्‍यक जागांसाठीच जाहिरात देऊन भरती केली आहे. सेवा तात्पुरती खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक होता. संघटना व कामगारांच्या लढ्यामुळे हा निर्णय बदलविण्यात आला. याचा आनंदच आहे. मात्र, प्रशिक्षण थांबविलेल्या फक्त अनुकंपा तत्वावरच्याच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. इतरांवर त्यामुळे अन्याय होणार आहे. इतिहासात पहिल्यांदा महिला चालक व वाहक कर्मचारी प्रशिक्षण घेत आहेत. इतरही पदांचे प्रशिक्षण थांबविलेले आहे. त्यांना पूर्ववत प्रशिक्षण देऊन सेवेत घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांना न्याय मिळवून देणारच.
संदीप शिंदे, राज्य अध्यक्ष, एसटी कामगार संघटना.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com