अर्धे सत्र संपल्यावर चौथ्या फेरीची सोडत!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नागपूर: शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. राज्यामध्ये आरटीईच्या तीन प्रवेश फेऱ्यांनंतर 7 हजार 408 जागा रिक्त असतानाही सरकारने दीड महिना प्रवेशफेरी घेतली नाही. आता अर्धे सत्र संपण्याच्या मार्गावर असताना, सरकारकडून आरटीईच्या चौथ्या फेरीची घोषणा करण्यात आली आहे. उद्या, सोमवारी (ता. 9) त्यासाठी सोडत काढण्यात येईल.

राज्यभरातील 2 हजार 717 शाळांसाठी 1 लाख 40 हजारांहून अर्ज प्राप्त झाले. प्रवेशाच्या तीन फेऱ्यानंतरही राज्यात 7 हजार 408 जागा रिक्त आहेत. नागपूर शहरामध्ये आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये 5 हजार 968 बालकांचे प्रवेश झाले आहे. आताही 1 हजार 236 जागा रिक्त आहेत. शहरातील 7 हजार 204 जागांसाठी 25 हजारांहून अधिक अर्ज आले होते. त्यामुळे अनेक पालक प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, सरकारने चौथी फेरी घेण्यास विलंब केल्याने अनेकांनी अन्य शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
आता उद्या, सोमवारी (ता. 9) या फेरीची प्रवेशाची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. मार्च महिन्यापासून आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना सहा महिने उलटूनही ती पूर्ण झालेली नाही. शाळा सुरू होऊन अर्धे सत्र संपत आहे. त्यानंतर आता आरटीईची चौथी फेरी होत असल्याने एक शाळा सोडून आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे शैक्षणिकदृष्ट्या पडविणारे नसून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.
पालकांची नाराजी
आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षीच घोळ होत असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षीही जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू होती. अर्धे सत्र संपल्यावरही मोठ्या प्रमाणात रिक्त जागा शिल्लक राहिल्या होत्या. विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या भोंगळ नियोजनावर पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकार यापासून धडा घेत नसल्याने प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the end of half the session Fourth round release!