पोलिसाच्या नाकावर ठोसा लगाऊन ठोकली धूम! वाचा आरोपीचे फिल्मीस्टाईल पलायन

मिलिंद उमरे
Saturday, 29 August 2020

आरोपी दुरू कतलामी याच्यावर कलम ३०२ अन्वये जारावंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी त्याला १६ जून २०१८ रोजी अहेरी येथील न्यायालयात नेत होते.

गडचिरोली : पोलिस आरोपीला घेऊन जात असतात. एका ठिकाणी पोलिसांची गाडी थांबते. आरोपीची पोलिसांशी हातापायी होते आणि आरोपी पलायन करतो. असा प्रसंग हिंदी सिनेमात नेहमी दिसतो. पण अशी घटना गडचिरोली जिल्ह्यात प्रत्यक्षात घडली.

अहेरी येथील न्यायालयात सुनावणीसाठी नेत असताना लघुशंका आल्याचा बहाणा करून पोलिसांच्या नाकावर ठोसा मारून फरार झालेल्या आरोपीस गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायाधीश दे. ग. कांबळे यांनी ३ वर्षांचा कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दुरू सोमा कतलामी(वय ३४) रा. शिरपूर टोला, ता. एटापल्ली असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी दुरू कतलामी याच्यावर कलम ३०२ अन्वये जारावंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी त्याला १६ जून २०१८ रोजी अहेरी येथील न्यायालयात नेत होते. दरम्यान अहेरी बसस्थानकाजवळ आरोपी दुरू याने लघुशंकेचे कारण सांगून पोलिस वाहन थांबविले. यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या नाकावर ठोसा मारून झुडपामधून पळ काढला.

सविस्तर वाचा - डॉन का छुटना अब नामुमकिन है; संतोष आंबेकरला पुन्हा अटक

याबाबत अहेरी पोलिस ठाण्यात कलम ३५२, २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक यशोदा बळीराम करणे यांनी तपास करून २२ जून २०१८ रोजी आरोपीस अटक केली. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा असल्याने न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने साक्षीदारांचे बयाण व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून आरोपी कतलामी याला तीन वर्षांचा कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Escape of Accused from police van