धामणगावात किन्नरांनी मांडला देवीचा जागर; मास्क घाला, देवीचे दर्शन घ्या

सायराबानो अहमद
Tuesday, 20 October 2020

धामणगावरेल्वे शहरातील दत्तापूर परिसरात गुरू शीतल नायक यांच्यासह आदी किन्नरांनी महाकालीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आदिमायेचा जागर सुरू केला आहे. कोरोनाच्या वैश्‍विक महामारीत मास्क असेल तरच दर्शन, असा खंबीर निर्णय त्यांनी घेतल्याने या महाकाली उत्सवाचे वेगळेपण दिसून येत आहे.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : एकीकडे स्त्रियांचे आराध्य म्हणून पुजल्या जाणाऱ्या आदिशक्ती नवदुर्गामातेचा नवरात्र उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असला; तरी किन्नरांचा पुढाकार तसा विरळाच असतो. या पार्श्‍वभूमीवर कायद्याने हक्क मिळाले असले; तरी अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या किन्नरांनी चक्क महाकालीचा जागर करीत आदिमायेच्या भक्तीसाठी लिंगभेद नगण्य असल्याचे सिद्ध केले आहे.

 
धामणगावरेल्वे शहरातील दत्तापूर परिसरात गुरू शीतल नायक यांच्यासह आदी किन्नरांनी महाकालीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आदिमायेचा जागर सुरू केला आहे. कोरोनाच्या वैश्‍विक महामारीत मास्क असेल तरच दर्शन, असा खंबीर निर्णय त्यांनी घेतल्याने या महाकाली उत्सवाचे वेगळेपण आपसूकच सिद्ध होत आहे.

जाणून घ्या :  मेळघाटचे दही, रबडी, खवा होणार ग्लोबल; पर्यटकांसाठीही खास मेजवानी

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसोदूर

या विश्‍वामध्ये मानवसृष्टीचे स्त्री आणि पुरुष या दोन वर्गांमध्ये वर्गीकरण केले जाते. मात्र या दोघांचाही संगम असलेली रचना म्हणजे किन्नर. आजही अन्य वंचित घटकांच्या कक्षेपासून काहीसे दुर्लक्षित आयुष्य जगणारा घटक म्हणूनच त्यांची ओळख आहे. कायद्याने समान हक्क मिळाला असला; तरी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अद्यापही किन्नर कोसोदूर आहेत.

नऊ दिवस सामाजिक उपक्रम

या परिस्थितीत ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे सुखदुःख आदिमाया जगदंबेने दूर करावे, या धारणेतून गुरू शीतल नायक यांनी सहा वर्षांपूर्वी महाकालीचा जागर सुरू केला आहे. येथे अश्‍विन नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवस अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.

अवश्य वाचा : सावळीच्या मंदिर परिसरात पडला चक्क पैशांचा पाऊस; अखेर पोलिसांनी बाहेर आणले सत्य

कोरोना संकट लवकर टळो

मात्र यंदा कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले असताना नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा, हा राज्य शासनाचा निकष तंतोतंत पाळताना मास्क असेल तरच प्रवेश, असा नवीन पायंडा या उत्सव परिसरात पाळला जात आहे. भक्तांना सॅनिटायझर केल्यानंतरच मास्कसह मंडपात प्रवेश दिला जातो. जगावर आलेले कोरोना संकट लवकरात लवकर टळावे, अशी प्रार्थना आम्ही दररोज महाकाली जवळ करीत असल्याची भावना किन्नरांनी या वेळी व्यक्त केली.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of Mahakali by Kinnara in Dhamangaon