esakal | राजस्थानवरील विजयानंतरही राहिला विदर्भ बादफेरीपासून वंचित, वाचा काय झाले असावे...
sakal

बोलून बातमी शोधा

Even after the victory over Rajasthan, Vidarbha remained deprived of the knockout stage

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर डिसेंबर 1992 मध्ये झालेली चारदिवसीय लढत खऱ्या अर्थाने विदर्भाच्या एकजुटीचा विजय होता. त्यांनी अंतिम क्षणापर्यंत चिवट झुंज देत हातून निसटलेला विजय खेचून आणला.

राजस्थानवरील विजयानंतरही राहिला विदर्भ बादफेरीपासून वंचित, वाचा काय झाले असावे...

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : फलंदाजांना गोलंदाजांची योग्य साथ मिळाल्यास कोणत्याही संघाला सहज पराभूत करता येऊ शकते, हे विदर्भ रणजी संघाने 28 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर राजस्थानला पराभूत करून सिद्ध करून दाखविले होते. दुर्दैवाने या विजयानंतरही विदर्भ संघ बादफेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता. त्यामुळे वैदर्भी खेळाडूंसाठी तो विजय "थोडी खुशी जादा गम' ठरला.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर डिसेंबर 1992 मध्ये झालेली चारदिवसीय लढत खऱ्या अर्थाने विदर्भाच्या एकजुटीचा विजय होता. त्यांनी अंतिम क्षणापर्यंत चिवट झुंज देत हातून निसटलेला विजय खेचून आणला. तत्कालीन राजस्थान संघात कर्णधार अस्लम बेग, एल. चतुर्वेदी, राहुल कांवत, पी. कृष्णकुमार, परमिंदर सिंग, विवेक यादव, रघुवीरसिंग राठोड, शमशेरसिंगसारखे दिग्गज होते, तर व्यावसायिक खेळाडू सुलक्षण कुलकर्णींच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या विदर्भ संघात प्रवीण हिंगणीकर, समीर गुजर, उस्मान गनी, योगेश घारे, मनोज गोगटे, राजेश गावंडे, प्रीतम गंधे, हर्षद हुद्दार व ट्रॅव्हर गोंसाल्व्हिसचा समावेश होता.

Video : दगड फोडताना उडतात धारदार तुकडे अन्‌ हात-पाय होतात रक्‍तबंबाळ, वाचा...

नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाने "स्पोर्टिंग विकेट'चा पुरेपूर फायदा उचलत फळ्यावर 338 धावा लावल्या. उस्मान गनी (94 धावा) व हेमंत वसू (79 धावा) यांनी शतकी भागीदारी करून विजयाची भक्कम पायाभरणी केली. विदर्भाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थाननेही धडाक्‍यात सुरुवात केली. विजय यादव व परमिंदरसिंगने सलामीलाच 70 धावा जोडून सामना रंगतदार होणार, याचे संकेत दिले. मात्र, त्यानंतर विदर्भाचे फिरकीपटू गंधे व वसू यांनी मधली फळी व "टेलेंडर्स'ना झटपट बाद करत राजस्थानचा डाव 266 धावांत गुंडाळला.

विलास जोशी (86 धावा) आणि विजय यादव (62 धावा) यांनी अर्धशतके ठोकून वैदर्भी गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली.
पहिल्या डावात 72 धावांची निर्णायक आघाडी घेणारा विदर्भ दुसऱ्या डावात काहीसा रिलॅक्‍स राहिला. त्यामुळे याचा फटका संघाला बसला. काही फलंदाजांनी मारलेल्या खराब फटक्‍यांमुळे विदर्भाला जेमतेम 204 धावांपर्यंतच मजल मारता आली. योगेश घारे यांची 74 धावांची चिवट खेळी आणि सलामीवीर मनोज गोगटे यांच्या 45 बहुमूल्य धावांमुळे विदर्भाला राजस्थानपुढे 277 धावांचे विजयी लक्ष्य ठेवता आले.

विदर्भाचा "काउंटर अटॅक'

खेळपट्टी अजूनही फलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे 277 धावांचे लक्ष्य राजस्थानसाठी फारसे अवघड नव्हते. परमिंदर-यादव जोडीने सलामीलाच शतकी सुरुवात करून दिल्यानंतर विजयाचा मार्ग आणखीणच सोपा झाला होता. त्याचवेळी मेहनतीवर पाणी फिरणार या भीतीपोटी विदर्भाच्या "ड्रेसिंग रूम'मध्येही अस्वस्थता वाढू लागली होती. अशावेळी कर्णधार कुळकर्णी यांनी चेंडू भरवशाच्या गंधे यांच्या हाती दिला. गंधे यांनीही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत यादव यांची महत्त्वपूर्ण विकेट काढून विदर्भाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर विदर्भाने "काउंटर अटॅक' करत राजस्थानचे एकेक फलंदाज आल्यापावली परत पाठवून 45 धावांनी रोमहर्षक विजय साजरा केला. दुसऱ्या डावात राजस्थानची एकवेळ 1 बाद 171 अशी मजबूत स्थिती होती. परमिंदरसारखा कसलेला फलंदाज खेळपट्टीवर असल्याने त्यावेळी कुणालाही विजयाची अपेक्षा नव्हती. परंतु, गंधे-वसू यांच्या फिरकी जोडीने भेदक मारा करत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.