esakal | यंदाही मृत्यूच्या फवारणीचा फास
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

यंदाही मृत्यूच्या फवारणीचा फास

sakal_logo
By
राजकुमार भीतकर

यवतमाळ : वऱ्हाड व विदर्भ कपाशीसाठी प्रसिद्ध आहे. कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी अनिवार्य असते. शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पिकांवर फवारणी करीत आले आहेत. तेंव्हा, विषबाधा झाल्याच्या घटना तुरळक घडत होत्या. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मृत्यूचीच फवारणी सुरू झाली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात वऱ्हाडात दोन व पश्‍चिम विदर्भातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. परंतु, या मृत्यूंची नोंद सरकारने घेतलेली दिसत नाही.
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑगस्ट महिन्यात एकूण 27 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यापैकी 12 रुग्णांवर उपचार करून सुट्टी देण्यात आली. सध्या अतिदक्षता विभागात 14 जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन ते तीन प्रकारचे जहाल कीटकनाशकांचे मिश्रण केले जात असल्याने बाधित होण्याचा धोका अधिकच वाढत चालला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी विदर्भातील 56 व यवतमाळ जिल्ह्यातील 22 शेतमजुरांचा कीटकनाशकांची विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला होता. तर हजारांवर शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले होते.
या घटनेने सरकार व प्रशासन अडचणीत आले होते. जगभरातील प्रसारमाध्यमांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती. तर मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र सरकारच्या 22 मंत्र्यांना यवतमाळात येऊन निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे लागले होते. त्यावेळी बोगस कीटकनाशकांचा वापर, दोन ते तीन जहाल कीटकनाशकांचे मिश्रण तयार करून ते पिकांवर फवारल्यामुळे विषाचे प्रमाण अधिक झाल्याने मृत्यू ओढवल्याची बाब पुढे आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या समस्येच्या खोलात जाऊन उपचार आणि उपाय केलेत. त्यामुळे मृत्यू रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले होते. त्यांनी तत्काळ आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गुजरात व मध्यप्रदेशातून येणारे बनावट कीटकनाशके जप्त करण्याचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात एकाही कीटकनाशक बाधिताचा मृत्यू झाला नाही, हे विशेष. परंतु, या खरीप हंगामात नेर तालुक्‍यातील घारेफळ येथील नितीन कचरे या शेतकऱ्याचा पहिला बळी गेला. अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील दोघांचा बळी गेला. मात्र, याची नोंद प्रशासनाने घेतल्याचे दिसत नाही. अमरावती विभागाच्या साप्ताहिक अहवालात कीटकनाशक बाधितांच्या मृत्यूची नोंद 'शून्य' अशी घेण्यात आलेली आहे. विभागात आतापर्यंत 222 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले, त्यापैकी 164 रुग्णांना उपचार करून सुटी देण्यात आली आहे. 58 रुग्णांवर 22 ऑगस्टपर्यंत उपचार सुरू होते, असे अहवालात नमूद केले आहे. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात दोघांचा मृत्यू झाला होता व काही रुग्ण भरती होते. यंदा ऑगस्ट महिन्यात 58 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अजून फवारणीचा वेग वाढायचाच आहे. हा वेग सप्टेंबर व नोव्हेंबर महिन्यात वाढतो. त्यावेळी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. फवारणी करताना शेतकऱ्यांनी संरक्षक किटचा वापर करणे आवश्‍यक आहे.

'वैद्यकीय महाविद्यालयात रोज एक किंवा दोन फवारणीबाधित रुग्ण भरती होत आहेत. बाधितांची विचारपूस केली असता, त्यांच्यापैकी कुणीही सुरक्षाकिटचा वापर केला नाही. शिवाय मिश्रण करून औषधाची फवारणी केली जात आहे. बाधितांवर तत्काळ उपचार व्हावे, यासाठी अतिदक्षता विभागात विशेष कक्ष तयार करण्यात आला असून, औषधसाठा उपलब्ध आहे.
- डॉ. बाबा येलके,
औषधशास्त्र विभाग प्रमुख, यवतमाळ.

'जिल्ह्यात बोगस कीटकनाशकांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. सरकार औषध कंपन्यांना पाठीशी घालत आहे. बाधितांना मदत टाळण्यासाठी हृदयविकाराचे कारणही पुढे केले जात आहे. म्हणूनच रुग्णालयात रुग्णांना भेटूही दिले जात नाही.'
- देवानंद पवार,
अध्यक्ष, किसान कॉंग्रेस कमिटी.

'संरक्षक कीटसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 25.20 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. कृषी केंद्रांनी शेतकऱ्यांना संरक्षक कीट रोखीने किंवा उधारीत विकत द्यायच्या आहेत. याबाबत सर्व कृषी केंद्रांना व कृषी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.'
-नवनाथ कोळपकर,

जिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ.

सेफ्टी किटचा पुरवठा
शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. 90 टक्के अनुदानावर फवारणी किटचा पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांनी फवारणी करताना किटचा वापर करावा व कीटकनाशकांत पीजीआरचे मिश्रण करू नये, असे आवाहन प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी पंकज बरडे यांनी केले आहे.

loading image
go to top