बंडखोरांना पाठबळ देणारेही रडारवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
वंचित बहुजन आघाडीने दिले कारवाईचे संकेत
नेक बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात

 

अकोला : वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाने दिलेल्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या बंडखोरांविरुद्ध पक्षाने कारवाईचे संकेत दिले आहे. त्यासोबतच या बंडखोरांना मदत करणारे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्तेही रडारवर आहेत. त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी दिले आहेत.

राज्यातील बदलेल्या राजकीय समिकरणानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भारिप-बमसंला सत्ता टिकविण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. या आव्हानाला सामोरे जाताना पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण उफाळून आले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्ष विरोधी कार्य केल्याचे आरोपपत्यारोप झालेत. त्याचे पडसात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतीही उमटत आहेत.

तिकिट वाटप करताना अनेकांची नाराजी झाली. पक्षाने अधिकृत घोषित केलेल्या उमेदवारांविरुद्ध अनेकांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे पक्षाची अडचण वाढली. अखेर अनेकांची मनधरणी करण्यात यश आले. त्यानंतरही काहींनी त्यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. भारिप-बमसंमधीलच या अपक्ष बंडखोर उमेदवारांना पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पाठबळ देत त्यांचा प्रचार करीत आहेत. असे नेते व पदाधिकारी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या रडारवर असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. भारिप-बमसंच्या अधिकृत उमेदवारांचाच प्रचार करण्याचा आदेशही त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.

बाळासाहेबांचा आज प्रचार दौरा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर शुक्रवार, ता.3 जानेवारी रोजी जिल्‍ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. सकाळी 9 वाजतापासून आगर येथे आयोजित सभेपासून प्रचाराला सुरुवात होईल. त्यानंतर 10 वाजता कुटासा, 11 वाजता सावरा, 12 वाजता मुंडगाव, 1.30 वाजता हिवरखेड, 3 वाजता अडसूळ फाटा, 4 वाजता निंबा फाटा, 5 वाजता पारस आणि 6.30 वाजता सस्ती येथे सभा होणार आहेत. या सभेला अशोक सिरसाट, प्रदीप वानखडे, प्रभाताई सिरसाट, प्रमोद देंडवे आदींची उपस्थिती राहील.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even on the radar, supporting the vanchit rebels