असेही दातृत्त्व... बँडवाल्याने भरवला 70 हजार भुकेल्यांना घास!

washim
washim

वाशीम : कोरोनाने एकीकडे सरकारी स्तरावर माणुसकी लॉक होत असताना, वाशीम येथील बँडचा व्यवसाय करणार्‍या व्यक्तीने तब्बल 67 दिवस 70 हजारांवर भुकेल्या पोटाला अन्न देण्याचे काम केले आहे. एकीकडे कोरोनाने बँडचा व्यवसाय ठप्प झाला असताना केवळ माणूसपणाच्या तळमळीने वाशीमवरून जाणारा प्रत्येक परप्रांतीय मजूर तृप्तीचा ढेकर देऊन गेला आहे. 

कोरोना विषाणूने सगळे विश्व उध्वस्त झाले आहे. त्यात पुकारलेल्या लॉकडाऊने पोटाची आग रस्ताभर हजारो किलोमीटर फरफटत गेली आहे. डोईवर सामानाचे ओझे, काखेत चिमुकले बाळ, बोटाला धरून चालणारी थकलेली पावलं आणी रस्ता नेईल तिकडे जाण्याची अगातिकता राज्याच्या प्रत्येक रस्ताभर दिसत होते.

पाणी कसेबसे मिळत होते. मात्र, भूकेने मलुल झालेले निरागस चेहरे आणी रक्ताळलेल्या पायापेक्षा चिमुकल्याच्या भुकेच्या वेदनेने खड्डा पडलेले पोट सांभाळत प्रवास करणारे तांडे वाशीमवरूनही जात होते. हे वास्तव प्रत्येकजण अनुभवत होता. काही काळ हळहळत होता. मात्र, हे अस्वस्थ चित्र पाहून वाशीम शहरातील लोकार्थाने फाटका असलेल्या मात्र, मनाने ‘राजा’ ठरलेल्या राजाभैय्या पवार यांनी काहितरी करण्याचा निश्‍चय केला. लग्नामधे बँडबाजा भाड्याने देवून आपला उदरनिर्वाह करणार्‍या राजाभैया पवार यांनी तडक घर गाठले. घरात होते नव्हते अन्न सोबत घेवून हमरस्ता गाठला.

अनेक भूकेले हात समोर आले. थकलेले डोळे चमकले नंतर तृप्तीचे ढेकर सुखावून गेले. राजाभैयांचा हा अन्नदानाचा महायज्ञ 68 दिवसापूर्वी सुरू  झाला. माहूरवेस परिसरात लॉकडाऊनेने विझलेल्या चुली जिवंत झाल्या. नंतर मित्रमंडळीच्या सहकार्याने हमरस्त्यावर राजाभैयांचे हे किचन सुरू  झाले. रस्त्याने जाणार्‍या प्रत्येक भुकेल्याला नम्रपणे हात जोडून थांबण्याची विनंती करायची, थंड पाणी, जेवणाचे पॅकेट, चहा लहान मुलांसाठी बिस्कीट देवून पुन्हा हात जोडून त्या प्रवाशाला निरोप द्यायचा. हा शिरस्ता गेल्या 67 दिवसांपासून पुसद नाक्यावर सुरू आहे.

सकाळी घरी अन्न शिजविल्यानंतर मित्रमंडळींनी ते सिलबंद करायचे ते रात्री बारा वाजेपर्यंत भुकेल्यांना द्यायचे. राजाभैया पवार तसे लौकिक आयुष्यात मध्यमवर्गीयांच्याही खालच्या रेषेतले. जमा असलेली सर्व पूंजी लोकांची भूक भागविण्यात खर्च होत होती, तरीही या अवलियाने धिर सोडला नाही. या सत्कार्याला अनेक हात राबत असताना अनेक हातांनी हातभार लावला. रोज नाक्यावर राजाभैया सोबत माणुसकीसाठी धडपडणारा गोतावळा उभा राहिला. हा गोतावळा वाशीम शहरासाठी भूषण ठरत आहे.

दररोज हजार- बाराशे भुकेल्यांना अन्नदानाचा महायज्ञ उभा होत असताना राजाभैय्या पवार यांच्यासोबत सुशील भिमजियाणी, नितीन मडके, महादेव हरकळ, राजू धोंगडे, देवेश पवार, आनंद खैरे, भावसार, विक्रांत बबेरवाल, विरू बबेरवाल, विनोद झाझोट, रवी गुप्ता, धनंजय रनखांम्ब, महेंद्र गंडागुळे, रमेश काका सोमाणी, ओम साई ठाकूर, रितेश हंबीर, शुभम पवार, विशाल बबेरवाल, श्याम सांभरे, सिद्धू लोखंडे, गोपाल गोटे, श्रीपाद भागवत, महेश धोंगडे या लोकसेवकांनी अहोरात्र सेवा बजावली.

पोट तृप्त, पावलांना गारवा
भुकेल्यांच्या ओठी घास भरविताना रस्त्याने जाणार्‍या अनेक मजुरांच्या पायात धड चप्पलही नव्हती. जगण्याचे अस्तित्वच डावावर लागलेले असताना आग ओकणार्‍या सुर्यानेही वरून कडी केली होती. मोठ्यांबरोबरच चिमुकलेही डांबरी रस्त्याने चालताना कळवळून जात होते. राजाभैय्या पवार यांनी तब्बल 200 जोडी चप्पल या होरपळणार्‍या पायांना बहाल केल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com