प्रत्येकाने रस्त्यावरचे आपापले खड्डे बुजवावे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वच प्रमुख मार्गांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्यांची उच्च न्यायालयानेसुद्धा दखल घेऊन जनहित याचिका स्वीकारली आहे. सर्व खड्ड्यांना महापालिकेलाच दोषी धरले जात आहे.

नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वच प्रमुख मार्गांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्यांची उच्च न्यायालयानेसुद्धा दखल घेऊन जनहित याचिका स्वीकारली आहे. सर्व खड्ड्यांना महापालिकेलाच दोषी धरले जात आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सुधार प्रन्यास, महामेट्रो, राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना त्यांच्या क्षेत्रांतर्गत पडलेल्या खड्यांची माहिती दिली.
महामेट्रोच्या कामामुळे कामठी रोड, वर्धा रोड, सेंट्रल एव्हेन्यू रोड, उत्तर अंबाझरी रोड या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्षेत्रांतर्गत भंडारा रोड, पारडी क्षेत्रात तसेच काटोल रोडवरील सदर क्षेत्रात यासोबतच नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील अनेक वस्त्यांमध्ये तर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालविताना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याची भीतीही मनपा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासंदर्भात मनपाने वेळोवेळी संबंधित विभागांना पत्रव्यवहारदेखील केला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित सर्व विभागांना पुन्हा एकदा खुद्द मनपा आयुक्त यांनी पत्र पाठविले आहे. यासंदर्भात पुढील काही उपाययोजना असल्यास त्याचीसुद्धा माहिती देण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी केलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everyone should dig their own pits on the road