शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माजी आमदारांसह अनेकाची नावे चर्चेत असून त्यासाठी इच्छुकांनी कंबर कसील असून, उमेदवारीसाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा सुरू आहे.

मूर्तिजापूर (जिल्हा अकोला) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यावेळी बहुरंगी लढत अपेक्षित आहे. त्यासाठी इच्छुकांनी कंबर कसील असून, उमेदवारीसाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा सुरू आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करणारे लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे, शिक्षकांचे प्रतिनिधी विधिमंडळात (विधानपरिषद) पाठविणे. त्यासाठी वेगवेगळे सात शिक्षक मतदारसंघ निर्माण करण्यात आले आहेत. त्यापैकी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ बाहुतांश वेळा नुटा, विमाशिसं, विज्युक्टाला कौल देणारा. माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व महाविद्यालयीन शिक्षकांचा पाठिंबा मिळविणारा शिक्षक या मतदारसंघात भक्कम मताधिक्य मिळवू शकतो. पदवीधर आणि शिक्षक अशा दोन आघाड्यांवर बी.टी.देशमुखांच्या नेतृत्वात हे चित्र वारंवार दिसून आले. 

हेही वाचा - कापसाचं नाणं खणखणणार!

पदवीधर मतदारसंघात धक्कादायक निकाल लागून विधिमंडळातील भीष्म मानल्या जाणाऱ्या बीटींना डॉ.रणजित पाटील यांनी पराभूत केले आणि चित्र बदलले. त्यानंतर शिक्षक मातदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांनी विजय मिळविला. यावेळी विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह विज्युक्टाचे प्रांतीय अध्यक्ष प्रा.अविनाश बोर्डे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिक्षक महासंघाचे शेखर भोयर आणि संगिता शिंदे अग्रनामांकीत आहेत. वाशीम जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे किरण सरनाईक यांनीही दंड थोपटले आहेत. विमाशी संघात फूट पडून नव्याने उभारणी झालेल्या पश्चिम विमाशिसंघाकडून विकास सावरकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विमाशिसंघाकडून श्रावण बरडे व जयदीप सोनखासकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजपवासी झालेले माजी आमदार वसंतराव खोटरे यांचेही नाव भाजपकडून समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जाणून घ्या - जिल्ह्यात दारू पिण्याचा परवाना दोनशेच जणांकडे

या निवडणुकीत विज्युक्टा, नुटा आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पाठबाळ संयुक्तरित्या मिळाल्यास विज्युक्टाचा वारू चौफेर उधळू शकतो. सध्यस्थितीत शिक्षकांवर विविध शासन निर्णयांच्या माध्यमातून वेगवेगळी गंडांतरे येत आहेत. अशा स्थितीत शिक्षक बांधवांनी सजग होऊन केवळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी वचनबद्ध आसणारा उमेदवार विधिमंडळात पाठविणे गरजेचे आहे, असा सूर जाणकारांमधून उमटत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expected to contest the elections of teachers' constituency