सावधान नागरिकांनो: मरण तुमच्या घरात!

सतीश दहाट
रविवार, 1 डिसेंबर 2019

व्यावसायिक कामाकरिता घरगुती सिलिंडर वापरणे नियमात नाही. याशिवाय चारचाकी वाहनामध्येही घरगुती सिलिंडरचा वापर होताना दिसून येतो.

कामठी, (जि. नागपूर) : "सावधान नागरिकांनो, मरण तुमच्या घरात' हे शीर्षक वाचून अवाक्‌ होण्याची गरज नाही, मात्र हे खरे आहे. तुमच्या घरात मुदतबाह्य सिलिंडर असेल तर त्या सिलिंडरचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. मुदतबाह्य सिलिंडरचा धोका टाळण्यासाठी कोणत्याही पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. प्रशासकीय स्तरावर ना ग्राहकांच्या पातळीवर प्रयत्न होत नाही. शहरासह जिल्ह्यातील काही घरगुती सिलिंडरची मुदत संपली तरी त्याचे कुणालाही गांभीर्य नसल्याचे स्फोटक व खळबळजनक वास्तव समोर येत आहे. 

एकविसाव्या शतकातील संगणक युगात शहरापासून अगदी ग्रामीण भागातदेखील मातीच्या चुलीवर स्वयंपाक न करता आता गॅस सिलिंडरवर स्वयंपाक केला जातो. मात्र नागरिकांचे वापर करण्यात येत असलेल्या सिलिंडरच्या मुदतीकडे लक्ष नसते. मात्र नक्की हीच बाब आपणास घातक ठरू शकते. नागरिकांना सिलिंडर मुदतबाह्य आहे किंवा नाही, याच्याशी काहीच देणेघेणेच नसते. ते बिनधास्त होऊन सिलिंडरचा वापर करीत असतात. नागरिकांचेही चुकत नाही कारण प्रशासनानेही याबाबत जागरूकता निर्माण केली नाही. नागरिकांनी स्वत:हून याबाबत सजग होणे गरजेचे झाले आहे. 

घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक उपयोग

मोठ्या कॅटरिंगवाल्यांसह हॉटेल तसेच चहाटपरीवालेसुद्धा व्यावसायिक सिलिंडर न वापरता घरगुती सिलिंडर वापरत आहेत. व्यावसायिक कामाकरिता घरगुती सिलिंडर वापरणे नियमात नाही. याशिवाय चारचाकी वाहनामध्येही घरगुती सिलिंडरचा वापर होताना दिसून येतो. यामुळे गरजूंना घरगुती सिलिंडर मिळत नाही. नागरिकांनी घरगुती सिलिंडरचा गैरवापर करू नये याकडे जिल्हा पुरवठा विभागानेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 

असे ओळखा मुदतबाह्य सिलिंडर

तुमच्या भागात कालबाह्य सिलिंडरचा पुरवठा होतो का, याची तपासणी अगदी सोपी आहे. प्रत्येक सिलिंडरच्या वरील भागात एक रिंग असते. या तीन पट्ट्यांनी मूळ सिलिंडरला जोडलेली असते. या तीन पट्ट्यांपैकी एका पट्टीवर ए.बी.सी.डी. यापैकी एक इंग्रजी वर्णाक्षर असते. गॅस कंपन्या एका वर्षाचे चार भाग करतात. या वर्णाक्षराच्या बाजूला एक आकडाही लिहिलेला असतो. हा आकडा संबंधित वर्ष दर्शवितो, हीच असते त्या सिलिंडरची मुदत. उदा. सिलिंडरवर सी. 18 लिहिलेले असेल तर त्याचा अर्थ त्या सिलिंडरची मुदत सप्टेंबर 2018 ला संपलेली आहे. 

गट व त्यातील महिने

A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 
B म्हणजे एप्रिल, मे, जून 
C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 
D म्हणजे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: expired cylinder use in homes