फेसबुक मैत्री पडू शकते महागात

अनिल कांबळे
सोमवार, 3 जून 2019

बदनामीची धमकी
मोबाईलमधील ब्ल्यू फिल्म किंवा अर्धनग्न फोटो फेसबुक-व्हॉट्‌सॲपवरून व्हायरल करण्याची धमकी मुलींना दिली जाते. त्या बदल्यात युवक मुलींना नेहमी शारीरिक संबंधाची मागणी करतात. एका प्रकरणात फेसबुक फ्रेंड आणि त्याच्या दोन मित्रांशी शारीरिक संबंध प्रस्थापित बाध्य  केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पालकांनो, ठेवा मुलींवर लक्ष; लैंगिक शोषणाच्या ठरताहेत बळी
नागपूर - प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे तर जीओमुळे प्रत्येकांकडे मुबलक इंटरनेट सुविधा आहे. अशातच सोशल मीडियाने युवा पिढीवर आपले मोहजाळ टाकले आहे. मात्र, काही युवक फेसबूकवरून मुलींना फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट पाठवून मैत्री करतात. नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याची धक्कादायक माहिती नागपूर पोलिसांकडील नोंदींवरून समोर आली आहे. 

गेल्या पाच महिन्यांत फेसबुकवरून मैत्री केल्यानंतर बलात्काराची १२ प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी फेसबूक फ्रेंड्‌सवर बलात्काराचे गुन्हेही दाखल केले आहेत. मोबाईलमध्ये फेसबुक सुविधा असल्यामुळे नवखेपणा म्हणून अनेक मुली कुणी ओळखीचे नसतानाही फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट पाठवतात. तर काही युवक मुलींचा फेसबुकवरून शोध घेऊन फोटोला लाईक करणे, चांगल्या कमेंट्‌स करणे असे प्रकार करतात. त्यानंतर मॅसेजिंग ॲपवरून मुलींशी चॅटिंग करीत तिला हळूहळू प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. तिचा मोबाईल क्रमांक मिळविल्यानंतर भेटी घेणे  तसेच तिला महागडे गिफ्ट देण्याचे प्रकार घडलेले आहेत. ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे...

तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही.’ असे भारी डॉयलॉग मारल्यानंतर भावुक असलेल्या मुली प्रेमांत आकंठ बुडतात. अशा मुलींच्या विश्‍वासाचा गैरफायदा घेऊन मित्राच्या रूमवर किंवा लॉजवर नेऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. असे युवक शारीरिक संबंधाचे मोबाईलने शूटिंग करणे, अश्‍लील फोटो काढणे, यासारखे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मुली कायमच्या जाळ्यात अडकून पडतात. 

मुलींनो... हे करा
- अनोळखी व्यक्‍तीची फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट स्वीकारू नका
- कुणाच्याही फोटोवर लाईक किंवा कमेंट करू नका
- कुणी कमेंट्‌स दिली तर लगेच रिॲक्‍ट होऊ नका
- कुणी उगाच चॅटिंग करीत असेल तर त्याला ब्लॉक करा
- वारंवार फोटोवर कमेंट्‌स करीत असल्यास त्याला अनफ्रेंड करा
- फेसबूकवर प्रोफाईल फोटो लॉक करून ठेवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook Friendship Dangerous Girl Alert