महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गंत आता 900 रुग्णालयात सुविधा

भगवान वानखेडे 
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शासनाचे सकारात्मक पाऊल 

अकोला  ः सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्या यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त सुरू करण्यात आली होती. 1 एप्रिलपर्यंत ही योजना राज्यातील केवळ 452 रुग्णालयापर्यंत सिमित होती. त्यात आता बदल करण्यात आला असून, कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर आता या योजनेचा राज्यातील 900 रुग्णालयातून लाभ घेण्यात येणार असल्याची माहिती योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकार दर दिवसाला आरोग्यविषयक विविधांगी योजना अंमलात आणत आहे. अशातच काही सकारात्मक तर काही नकारात्मक अफवाही पसरविल्या जात आहेत. यातच कोरोनामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी माहिती दिली की, उलट कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. राज्यात आधी ४५२ रुग्णालयात या योजनेचा लाभ मिळत होता. ते आता शासकीय आणि खासगी असे मिळून ९०० रुग्णालयातून मिळणार आहे. तेव्हा नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.

गरज पडल्यास खासगी रुग्णालयातून मिळणार उपचार
हात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गंत सध्या शासकीय रुग्णालयातून कोरोना आणि इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, भविष्यात गरज पडल्यास या योजनेतर्गंत येणाऱ्या खासगी रुग्णालयांना कोविड-१९ बाधितांच्या उपचारासाठी कामी लावता येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

योजनेमध्ये समाविष्ट लाभार्थी
दारिद्र्य रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना , अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक व दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक (रु.1 लाखापयंत वार्षिक उत्पन्न असलेली ) कुटुंबे (शासकीय,निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून)
औरंगाबाद , अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा असे एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रक शेतकरी कुटुंबे
शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब व अन्य लाभार्थी
संबधित प्रशासकीय विभागाकडून या लाभार्थी घटकांची अचूक आकडेवारी उपलब्ध करून घेऊन लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात येइल व या लाभार्थी घटकांना योजनेअंतर्गत विमा तर्मा संरक्षण उपलब्ध करुन दिले जाईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेला कोठेही ब्रेक लागला नसून, या योजनेतर्गंत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे १ एप्रिलपासून या योजनेची व्याप्ती वाढविण्यात असून, नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
-डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facilities in 900 hospitals now under Mahatma Phule Health Scheme