युवकांना बागेच्या साफसफाईची शिक्षा; खोटी तक्रार देणे भोवले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा दिवस बगीच्याची साफसफाई करण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे. 

नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा दिवस बगीच्याची साफसफाई करण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे. 
अमरावती शहरातील एका दुकानामध्ये काम करणारा मजहर खान अफझल खान हा युवक 24 जून रोजी नागपुरी गेट पोलिस स्टेशनच्या हद्दीमधून दुचाकीने जात होता. वाटेमध्ये त्याला ओळखीचा युवक अलफाज अहमद अजाझ अहमद याने अडविले. दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. अलफाजने मजरच्या कानशिलात लगावत "आपल्या मालकाकडून 11 लाख रुपये आण; नाही तर तुला पाहून घेतो' अशी धमकी दिली. त्यामुळे, मजहर खान अफझल खान याने नागपुरी गेट पोलिस स्टेशनमध्ये अलफाजविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अलफाज अहमद अजाझ अहमद विरुद्ध कलम 387, 341, 506 नुसार खंडणीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना तक्रारीत तथ्य आढळले नाही. दरम्यान, आरोपी आणि तक्रारदार तरुणांनी उच्च न्यायालयामध्ये संयुक्त अर्ज करीत हा गुन्हा रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली. अलफाजने रागाच्या भरामध्ये मारले असून हा खंडणीचा प्रकार नाही, असेही या अर्जामध्ये नमूद केले. यावर, सरकारी वकील केतकी जोशी यांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. या प्रकरणासाठी आवश्‍यक शासकीय यंत्रणा कामी लागली; नव्हे तर आपला महत्त्वाचा वेळसुद्धा या कामी दिला. या तरुणांनी सर्व व्यवस्था डोक्‍यावर घेतली. त्यामुळे, न्यायालयाने यांना शिक्षा द्यायलाचं हवी, अशी विनंती ऍड. केतकी जोशी यांनी न्यायालयाला केली. त्यानुसार, उच्च न्यायालयाने या दोघांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बगीच्याची पंधरा दिवस साफसफाई करण्याची शिक्षा दिली. 
कुलसचिवांनी जागा निश्‍चित करावी 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांनी या तरुणांसाठी बागेमध्ये दोन स्वतंत्र जागा निर्धारित करून द्याव्या. त्यांना बागेची स्वच्छता, झाडांची निगा राखण्यासोबतच झाडांची देखभाल करण्याचे पंधरा दिवस काम द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने कुलसचिवांना दिले. तसेच, त्यांच्या कामांचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर करावा, असेही आदेशामध्ये नमूद केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake complaint, court, punishment