संचारबंदीत बनावट ई-पासचा गोरखधंदा; तीन दिवसांची पोलिस कोठडी 

संतोष ताकपिरे 
Sunday, 9 August 2020

सदर कार नागपूर येथून अमरावती आणि अमरावती येथून पुणे येथे काही प्रवाशांना घेऊन जात होती. संचारबंदी सुरू झाल्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी यशोदानगर चौकात ही कार थांबविली.

अमरावती  ः कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या काळात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेशासाठी वाहनचालकाजवळ आवश्‍यक असलेल्या ई-पासचा मोठ्या प्रमाणात गोरखधंदा सुरू असल्याची बाब पोलिसांनी केलेल्या एका कारवाईतून उघडकीस आला.

 

हे वाचा— नागपुरातील लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय...

अमोल चंद्रमणी मेश्राम (वय 19, रा. स्वागतनगर, नागपूर) व अक्षय रॉय (रा. नागपूर) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी अमोल यास फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. अक्षय हा रॉय यांच्या एमएच 31 एफसी 4255 क्रमांकाच्या वाहनावर रोजंदारी चालक म्हणून कार्यरत आहे. सदर कार नागपूर येथून अमरावती आणि अमरावती येथून पुणे येथे काही प्रवाशांना घेऊन जात होती. संचारबंदी सुरू झाल्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी यशोदानगर चौकात ही कार थांबविली. नियमाप्रमाणे कारच्या काचांवर दर्शनीय भागात ई-पास लावणे बंधनकारक आहे. परंतु या कारच्या काचांवर पोलिसांना ई-पास दिसली नाही. वाहनचालक अक्षय यांनी पोलिसांना त्याचे मोबाईलमध्ये असलेली ई-पास दाखविली. पोलिसांनी ई-पासवरील क्‍युआरकोड, बारकोड मोबाईलमधील अप्लीकेशनद्वारे तपासला. तो क्रमांक वाहनचालक अमोल मेश्रामच्या नावाचा नसून, अक्षय रॉयच्या नावे असल्याचे नमुद होते. रॉय यांनीच हा पास अक्षयच्या मोबाईलवर पाठवून त्याला नागपूर येथून दोघांना अमरावती येथे तर, अमरावती येथील महिलेला अमरावती येथून पुण्यात सोडण्याचा आणि तेथून 10 ऑगस्ट रोजी परतण्याचा उल्लेख पोलिसांना आढळला. शिवाय अमोल मेश्रामच्या मोबाईलवर दिलेल्या ईपासवर वेगळ्याच प्रवाशांची नावे दिसली. चालक मेश्राम यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली असता, त्याला पोलिसांनी अटक केली. बनावट ई-पासवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगोही होता. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी वाहनचालक मेश्राम व वाहनमालक अक्षय रॉय या दोघांविरुद्ध फसवणूक, विश्‍वासघात, बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
अटक चालक अमोल मेश्राम याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने अक्षयला मंगळवारपर्यंत (ता. 11) पोलिस कोठडी सुनावली.

जुलै मधील ई-पासचा ऑगस्टमध्ये वापर
अमोल मेश्राम याच्याजवळ जो ई-पास आढळला. तो रॉय यांनी 4 जुलै 2020 रोजी तीन प्रवाशांच्या नावाचा उल्लेख करून बनविला होता. त्याच ई-पासवर हेराफेरी करून नवीन नावे टाकून महिन्याभराने त्याचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake e-pass scam in communication; Three days in police custody