भंडाऱ्यातील प्रसिद्ध पांडे महाल अखेर विकला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

भंडारा - शहरातील ऐतिहासिक वारसा असलेला आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित पांडे महाल अखेर बिल्डरच्या घशात गेला. सहदुय्यम निबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 12) शासकीय नियमांची पायमल्ली करीत अखेर पांडे महालाचे विक्रीपत्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

भंडारा - शहरातील ऐतिहासिक वारसा असलेला आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित पांडे महाल अखेर बिल्डरच्या घशात गेला. सहदुय्यम निबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 12) शासकीय नियमांची पायमल्ली करीत अखेर पांडे महालाचे विक्रीपत्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विक्रीपत्रानुसार दोन कोटी 93 लाख 40 हजार रुपयांत महालाची खरेदी करण्यात आली. या ऐतिहासिक महालाची विक्री करण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली होती. तरीही ही विक्री झाली आहे. यापूर्वी 2012 मध्ये महाल विक्रीचा प्रयत्न उधळून लावला होता.

या महालातील हत्तीखाना, रथवाडी या वास्तूंच्या पाठोपाठ आता महालाच्या जागी सिमेंट कॉंक्रिटचा इमला उभारण्याचा डाव साधला जात आहे. पांडे महाल राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची प्राथमिक अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयाचा आधार घेत शहरातील काही उद्योजक व बिल्डर लॉबीने हा महाल घशात घालण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. अखेर त्यात यश आले व या महालाची विक्री झाली.

विशेष म्हणजे महालाच्या विक्रीपत्रात संरक्षित स्मारकाचा दर्जा रद्द केल्याच्या अधिसूचनेची प्रत लावली नाही. त्यामुळे या विक्रीबाबत संशय निर्माण झाला आहे.

पुरातन व ऐतिहासिक पांडे महाल 100 वर्षांपूर्वीचा आहे. मात्र, नगर परिषदेने 11 मे 2017 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रात ही वास्तू 70 वर्षांपूर्वीची असलेली जावईशोध लावला आहे. शासनाच्या धोरणानुसार 100 वर्षांपूर्वीची वास्तू असल्यास ती विकता येत नाही. त्यामुळेच वास्तूची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाची दिशाभूल केल्याचे दिसते.

पाच वर्षांपूर्वी झालेला प्रयत्न आपण हाणून पाडला होता. त्यानंतर पांडे महालाचे जतन करण्यासाठी राज्यपालाच्या स्वाक्षरीने अधिसूचना काढण्यात आली होती. परंतु, नंतरच्या काळात ती रद्द कशी झाली? या मागे कोण आहेत, त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. त्यामुळे या वास्तूची विक्री झाली आहे. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून हे षड्‌यंत्र रचण्यात आले, असे दिसते.
- नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार (भंडारा)

महालाचा इतिहास
सतराव्या शतकात लॉर्ड हेस्टिंगच्या काळात येथे 60 हजार चौरस फुटात या महालाचे बांधकाम करण्यात आले होते. पुरातत्त्व व सांस्कृतिक कार्य विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते. परंतु, दिवंगत यादवराव पांडे यांचे वारस व शासनाच्या उदासीनतेमुळे या वास्तूला अवकळा आली आहे. नागपूरकर भोसल्यांचे सावकार व भंडारा सुभ्याचे मानद कमिशनर असलेल्या यादवराव पांडे यांनी या महालाचे बांधकाम केले होते. 1898 मध्ये इंग्रजांनी पोलिस कारवाई करून हा महाल ताब्यात घेतला. परंतु, 1901 मध्ये या महालाची मालकी गणपतराव पांडे यांना सोपविण्यात आली.

शहराच्या मध्यवर्ती व मोक्‍याच्या जागी असलेल्या व दोनशे खोल्यांच्या या महालातील सर्व खोल्या व दिवाणखाने कलाकृतीने सजलेले आहेत. बेल्जियम काचेचे भव्य आरसे, झुंबर, इटालियन मार्बल टाईल्स, फवारे, सुंदर नक्षीकाम व भव्य आकर्षक बांधणी यामुळे हा महाल अद्वितीय आहे. आज त्या सौंदर्याला अवकळा आली असली तरी त्याचे अवशेष त्याच्या संपन्न वैभवाची साक्ष देतो. गणेशोत्सवाप्रसंगी खुल्या असलेल्या महालातील कलाकुसर व रोषणाई पाहण्यासाठी आजही नागरिक हजेरी लावतात.

Web Title: famous pande mahal sailing