दोन मुले, पत्नी व वडिलांचा विचार डोक्यातून काढून उचलले टोकाचे पाऊल

टीम ई सकाळ
Monday, 2 November 2020

शेतातील शेतपीक पूर व किडरोगाने ग्रस्त झाल्याने घरात कोणीही नसल्याचे पाहून मानसिक तणावात येऊन शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पाचगाव येथे घडली. मनोज खुशाल दोनाडकर (४०, रा. पाचगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

नांदगावपेठ (जि. अमरावती) : नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी (ता. एक) सकाळी साडेसात वाजेदरम्यान उघडकीस आली. पुंडलिक देवीदास मेटकर (वय ५५) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ते फत्तेपूर येथील रहिवासी आहे.

पुंडलिक मेटकर यांच्याकडे स्वतःची शेती आहे. त्यांनी यावर्षी वीस एकर शेती लागवडीने केली होती. मात्र, सोयाबीन पिकाने केलेला दगाफटका, सतत होणारी नापिकी व डोक्‍यावर असलेल्या कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून पुंडलिक मेटकर यांनी शनिवारी रात्री सार्शी शेतशिवारात साबळे यांच्या शेतात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.

जाणून घ्या - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

सकाळी सात वाजेदरम्यान शेतमालक साबळे यांना पुंडलिक मेटकर यांचा लटकलेला मृतदेह दिसताच तातडीने माहुली जहागीर पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहुली जहागीर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल गजानन धर्माळे, राजकुमार थोटे व कपिले यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. मृत शेतकऱ्यास दोन मुले, पत्नी, वडील असा परिवार आहे.

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

शेतातील शेतपीक पूर व किडरोगाने ग्रस्त झाल्याने घरात कोणीही नसल्याचे पाहून मानसिक तणावात येऊन शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पाचगाव येथे घडली. मनोज खुशाल दोनाडकर (४०, रा. पाचगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मृताकडे मालकी साडेतीन ते चार एकर शेतजमीन आहे. या जमिनीत यंदाच्या खरिपात धान पिकाची लागवड देखील केली. मात्र, दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरासह परतीच्या पावसाने व किडरोगाने लागवडीखालील पिकशेती नष्ट झाल्याचे पाहून गत काही महिन्यांपासून मानसिक तणावात दिसून येत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी - Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा

घटनेच्या दिवशी घरात कोणीही नसल्याचे पाहून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती कुटुंबीयांना होताच संबंधीतांनी उपचारार्थ भंडारा येथे हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पालांदूर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer commits suicide in Amravat and Bhandara district