esakal | हृदयद्रावक! लग्नाचे बाशिंग बांधण्यापूर्वीच नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer commits suicide in Warud taluka of Amravati district

नीलेश कोहळे हा विद्युत सहायक म्हणून कार्यरत होता. पुढील महिन्यात त्याचा विवाह होणार होता. परंतु, विवाहापूर्वी त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नीलेशच्या वडिलांच्या नावाने सहा एकर शेती होती. ती शेती नीलेश सांभाळत होता.

हृदयद्रावक! लग्नाचे बाशिंग बांधण्यापूर्वीच नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

वरुड (जि. अमरावती) : लग्नाचे बाशिंग बांधण्यापूर्वीच नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सकाळच्या सुमारास तालुक्‍यातील शिंगोरी येथे उघडकीस आली. या घटनेने शिंगोरी गावामध्ये खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नीलेश रामदास कोहळे हा युवक गुरुवारी (ता. १९) सायंकाळच्या सुमारास घरून गेला होता. तो रात्री परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो आढळून आला नाही. काल सकाळच्या सुमारास ममदापूर शेतशिवारातील एका शेतात नरेश पारधेकर यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत नीलेश दिसून आला.

क्लिक करा - शाळा सुरू करण्यात संस्थाचालकांना अडचणींचा ‘स्पीडब्रेकर’

नीलेश कोहळे हा विद्युत सहायक म्हणून कार्यरत होता. पुढील महिन्यात त्याचा विवाह होणार होता. परंतु, विवाहापूर्वी त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नीलेशच्या वडिलांच्या नावाने सहा एकर शेती होती. ती शेती नीलेश सांभाळत होता. गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे तो चिंताग्रस्त असल्याचे सांगण्यात येते. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

घटनेची माहिती बेनोडा शहीद पोलिसांना दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. काल सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाणून घ्या - 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक!

नीलेशच्या मागे वडील, भाऊ, बहीण असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image