शेतकऱ्यांच्या विकासासाठी संघटन आवश्‍यक - असीमकुमार गुप्ता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

...आणि शेतकरी गहिवरला
कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता संवाद साधत असताना एक शेतकरी अचानक गहिवरून बोलू लागला. ‘‘आजवर अशा विषयाची आमच्याकडे पुरेशी माहिती नव्हती; पण ॲग्री स्कीलिंगचा कोर्स केल्यावर आमच्या हे लक्षात आले की, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आमच्या प्रगतीसाठी काम करायला हवे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि त्यात शेतकऱ्यांच्या प्रगतीचे गमक आहे.’’ या शेतकऱ्याचे निवेदन ऐकल्यावर गुप्ता यांनी या उपक्रमाच्या व्याप्ती व उपयोगितेसंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌घाटन सोमवारी विकासभवन येथे झाले. याप्रसंगी ते बोलत होते. 

‘सकाळ'च्या सिमॅसिस लर्निंग एलएलपी व पॅलेडियम इंडियाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास कार्यक्रमात प्रशिक्षित झालेल्या आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, एमएसडीपीचे योगेश खिराळे, ‘नाबार्ड'चे जिल्हा व्यवस्थापक प्रवीण मुळे, धनंजय वाघ, ‘सकाळ'चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांची उपस्थिती होती. 

या वेळी गुप्ता म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची पसंती आणि आधारभूत माहितीच्या सहायाने प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीसाठी स्वतंत्र व्यवसाय योजना विकसित करण्यात येईल. शेतकऱ्यांकडून व्यवसाय आराखडे तयार करून ते शासनाकडून मंजूर करून घेण्यात येतील.''जिल्हाधिकारी भीमनवार यांनी, गटशेतीशिवाय शेतकऱ्यांचा विकास शक्‍य नसून उत्पादक कंपन्यांनी शेतमाल प्रक्रिया व विक्री यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे सांगितले. कार्यशाळेची प्रस्तावना शैलेश पांडे यांनी केली.

कार्यशाळेत वेल्सस्पनचे चंद्रमोहन बांड यांनी कापूस खरेदीची, बाय ॲग्रोचे हसन रफीक यांनी भाजीपाला खरेदी व निर्यात तर जीव्हीआर न्युट्रीज कंपनीचे वरुण राठी यांनी तूर, हरभरा खरेदीची माहिती दिली. दुसऱ्या सत्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या यशोगाथा सादर करण्यात आल्या. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Development Composition Important Asimkumar Gupta