लोंबकळणाऱ्या वीजतारांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

अमरावती : तीन महिन्यांपासून खांबासह शेतात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांचा बंदोबस्त करण्यात न आल्याने त्याचा स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जनप्रतिनिधींसह संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातल्यामुळे तणाव निर्माण झाला.

अमरावती : तीन महिन्यांपासून खांबासह शेतात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांचा बंदोबस्त करण्यात न आल्याने त्याचा स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जनप्रतिनिधींसह संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातल्यामुळे तणाव निर्माण झाला.
रूपराव नागोराव ठाकरे (वय 68, रा. सालोरा बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर आमदार यशोमती ठाकूर, प्रकाश साबळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ इर्विनमध्ये धडकले. ज्या गावात घटना घडली तो परिसर महावितरणच्या अमरावती ग्रामीण विभागात येतो. शिराळालगत सालोरा येथे ठाकरे यांच्या मालकीचे दोन एकर शेत आहे. परिसरात विजेच्या खांबासह त्यावरील तार तीन-चार महिन्यांपासून खाली लोंबकळत आहे. काही खांब आणि तारा जमिनीवर आहेत. अनेक शेतांमध्ये ही परिस्थिती असून, खाली कोसळलेल्या तारा तसेच खांबांची दुरुस्ती करावी यासाठी ग्रामस्थांनी महावितरणला अनेकदा विनंती अर्ज केले; परंतु अद्याप दुरुस्ती झाली नाही. त्याबद्दल ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. सद्य:स्थितीत शेतात पीक असल्याने मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली. ठाकरे यांनी दोन एकरमध्ये सोयाबीनचा पेरा केला होता. पीक काढणीला आल्याने त्यापूर्वी ते झाडांमध्ये साचलेला कचरा साफ करण्यासाठी मंगळवारी (ता. 24) सकाळीच शेतात गेले होते. लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनीचा पायाला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी तीनच्या सुमारास ठाकरे यांना बघण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि काही ग्रामस्थ गेले होते. घटनेची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना देऊनही कुणीच घटनास्थळी पोचले नसल्याचा आरोप त्यांनी केला. उपअभियंता उज्ज्वल गावंडे हे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. वलगाव पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शेतकऱ्याचा मृतदेह इर्विनमध्ये आणला. जबाबदार वीज कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने इर्विनमध्ये तणाव निर्माण झाला होता. समजुतीनंतर ग्रामस्थ शांत झाले.
मदतीचे आश्‍वासन
शिवाय मृत शेतकरी रूपराव ठाकरे यांच्या कुटुंबीयांना नियमानुसार मदत देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer dies due to hanging electrick wires in the farm