शेतकऱ्यांनो, तुम्हीही करा `यांचे` अनुकरण आणि व्हा मालामाल! 

किशोर वालदे 
Thursday, 30 April 2020

साखरीटोला येथील प्रभाकर दोनोडे यांनी आपल्या चार एकर जमिनीपैकी काही जमिनीवर धानपिक तर काही जमिनीवर भाजीपाला व फळपिकाची लागवड केली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून पेरू, चिकू, लिंबू, फणस, बोर, आंबा यासह अन्य पिकांची लागवड केली. यातून वर्षाकाठी तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

साखरीटोला (जि. गोंदिया) : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. साहजिकच उत्पादनात घटीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केवळ खरीप व रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या धानपिकावर अवलंबून न राहता भाजीपाला, फळपिकांची लागवड हा पर्याय निवडला तर, शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल, यात दुमत नाही. असाच प्रयत्न साखरीटोला येथील प्रभाकर दोनोडे या शेतकऱ्याने केला. चार एकरांत धानपिकासह भाजीपाला, फळबाग लागवड केली. यातून वर्षाकाठी तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

वर्षाला तीन-चार लाखांचे होते उत्पन्न 

आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अशी सालेकसा तालुक्‍याची ओळख. या तालुक्‍यातील नागरिकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. धानपीक हे मुख्यत्वाने घेतले जाणारे पीक असले तरी, आधुनिकतेची कास धरत या तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी शेतात नानाविध प्रयोग करणे सुरू केले. धानपिकाला पर्याय निवडला. भाजीपाला, फळबाग लागवड करू लागला. यातून आर्थिक उन्नतीचा मार्गही शेतकरी शोधू लागला आहे. साखरीटोला येथील प्रभाकर दोनोडे यांनी आपल्या चार एकर जमिनीपैकी काही जमिनीवर धानपिक तर काही जमिनीवर भाजीपाला व फळपिकाची लागवड केली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून पेरू, चिकू, लिंबू, फणस, बोर, आंबा यासह अन्य पिकांची लागवड केली. यातून वर्षाकाठी तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

अवश्य वाचा- हाय रे दैवा! घरची चूल पेटविण्यासाठी `आमदारा`ला विकावी लागतेय मोळी

सालेकसा तालुक्‍यामध्ये एक आदर्श शेतकरी म्हणून प्रभाकर दोनोडे यांना ओळखले जाते. उत्पन्नात वाढ कशी करता येईल, यासाठी त्यांना किसान कृषी केंद्राचे संचालक देवराम चुटे यांचे नेहमी सहकार्य लाभते. चुटे हे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन करीत असतात आणि याचाच फायदा दोनोडे यांना मिळाला आहे. 

मला लहान वयापासूनच शेतीची आवड आहे. परंतु, नुसते धानपीक घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ होणार नाही किंवा शेतकऱ्यांचा विकास होणार नाही म्हणून मी शेतात फळपिके व भाजीपाला यांची लागवड केली. त्यामुळे माझ्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याने धानपिकासह भाजीपाला व फळांची लागवड करावी असे मला वाटते. 

-प्रभाकर दोनोडे, शेतकरी, साखरीटोला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A farmer is doing success farming and gaining Lakhs of income