
धान उत्पादक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. सावली, नागभीड, ब्रह्मपुरी, मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतले जाते. कृषी क्षेत्रात नवेनवे प्रयोग सुरू आहेत. नवे तंत्रज्ञान कृषी क्षेत्राला विकसित करीत आहेत.
चंद्रपूर : घराच्या स्लॅबवर फुल, झाड, वेल लावण्याचे प्रकार तुम्ही बघितला असालच. मात्र, एका मॉडर्न शेतकऱ्याने चक्क घराच्या स्लॅबवर धान पऱ्हे उगविण्याची किमया साधली आहे. एक दोन नव्हे तर 300 ट्रेमध्ये धानपऱ्हे फुलले आहेत. तीन एकर धानशेतीत या पऱ्ह्याची रोवणी केली. मुल तालुक्यातील चिखली येथील प्रमोद कडस्कर या शेतकऱ्याने हा नवा प्रयोग यशस्वी केला आहे.
धान उत्पादक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. सावली, नागभीड, ब्रह्मपुरी, मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतले जाते. कृषी क्षेत्रात नवेनवे प्रयोग सुरू आहेत. नवे तंत्रज्ञान कृषी क्षेत्राला विकसित करीत आहेत. मात्र, आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात. मूल तालुक्यात येणाऱ्या चिखली येथील प्रमोद कडस्कर या शेतकऱ्याने मात्र नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती उभी केली आहे. त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. मुल तालुक्यात संगोपन शेतकरी उत्पादक प्रोड्यूसर कंपनी या भागातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात होणाऱ्या नव्या बदलांची माहिती देत असते.
GoodNews : कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस १० ऑगस्टला; पहिला प्रयोग यशस्वी होण्याचा विश्वास
नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तोट्यात चाललेली शेतीत नफा मिळवून देऊ शकते हेही कंपनीचे पदाधिकारी पटवून देत आहे. या कंपनीचा महेंद्र कंपनीशी करार केला आहे. या कंपनीने या हंगामात शेतकऱ्यांना अनुदानावर नवे यंत्र पुरविले. त्यात धान कापणी, धान रोवणी यंत्रासह अन्य यंत्र उपलब्ध करून दिले. या कंपनीने शेतकऱ्यांना ट्रेही पुरविले होते. याच ट्रेचा वापर किशोर कडस्कर यांनी धानाचे पऱ्हे लावण्यासाठी केला. सहसा धानाचे पऱ्हे शेतात, नर्सरीत टाकले जातात. मात्र, कडस्कर यांनी आपल्या घराच्या टेरेसवर तीनशे ट्रेमध्ये धानाचे बियाणे टाकले. जवळपास तीन दिवसांत अंकुर बाहेर आले. त्यानंतर त्यांनी धानपऱ्ह्याची शेतात रोवणी केली.
शेतकरी संगोपन प्रोड्यूसर कंपनीने मूल तालुक्यात येणाऱ्या राजोली, मारडा, चिखली येथील शेतकऱ्यांना धान पऱ्हे उगविण्यासाठी प्लास्टिक ट्रेचे वाटप केले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात, अंगणात या ट्रेमध्ये धानपऱ्हे उगविलेत. मात्र, चिखली येथील प्रमोद कडस्कर या शेतकऱ्याने चक्क घराच्या स्लॅबवर धानपऱ्हे टाकलेत. तीनशे ट्रेमध्ये त्यांनी धानाची बिजाई टाकली. तीन दिवसांनंतर ट्रेमध्ये अंकूर दिसू लागलेत. प्रत्येक ट्रेमधील पऱ्हायांना पाणी पोहोचेल, अशी सुविधा त्यांनी केली. पंधरा ते वीस दिवसांत ट्रेमधील पऱ्हे रोवणीयोग्य झाले. तीनशे ट्रेमधील धानपऱ्ह्यांची रोवणी तीन एकर शेतीत केली.
टेरिसवर धानपऱ्हे उगविण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने भविष्यात शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यंदा कृषी विभागाने शेतकऱ्यांना मानव विकास योजनेतून धान कापणी, धान रोवणी यंत्र अनुदानावर दिले आहे. या यंत्राच्या मदतीने धान रोवणीची कामे होत आहे. यातून मजुरीचा खर्चही वाचला आहे.
संपादन : राजेंद्र मारोटकर