Amravati News : चाऱ्यासाठी गुरांचे परप्रांतात स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer migration for cattle fodder Gawli community amravati vidarbha

Amravati News : चाऱ्यासाठी गुरांचे परप्रांतात स्थलांतर

जामली,(अमरावती) : मेळघाटात गवळी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचा व्यवसाय गुरेपालन असून चाऱ्याच्या शोधार्थ हा समाज सहा महिने मेळघाटात तर सहा महिने वऱ्हाडात भटकंती करीत असतो. गुरांसाठी त्यांना ऊन, वारा व पावसाशी संघर्ष करून जीवन जगावे लागते.

गवळी समाजाची लोकसंख्या मेळघाटात जवळपास ४० ते ५० हजारांच्या आसपास आहे. गुरेपालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु व्याघ्र प्रकल्पातील जाचक अटींमुळे आता या व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे.

मेळघाटात जून ते डिसेंबर या महिन्यापर्यंत गुरांना चारा उपलब्ध असतो, पण खरीप हंगाम संपताच येथील जंगलातील चाराही संपतो व नदी-नाल्यातील पाणीही आटते. त्यामुळे हा समाज आपल्या कुटुंबासह गुराढोरांना सोबत घेऊन डिसेंबर ते जून महिन्यापर्यंत चाऱ्याच्या शोधात चारा मिळेल तेथे वणवण भटकंती करीत असतो.

त्यामुळे एकीकडे कुटुंबाचे व जनावरांचे पालन पोषण करावे की मुलांचे शिक्षण करावे, या द्विधा मन:स्थितीत तो सापडला आहे.

शासनाने गुरांचा चारा, पाणी तसेच शासकीय दूध डेअरीची मेळघाटात विशेष व्यवस्था करावी, जेणेकरून येथील तरुण दुग्ध व्यवसायाकडे वळेल. तसेच गवळी समाजाचा आर्थिक व शैक्षणिक स्तर उंचावेल.

— शंकर खडके, तालुकाध्यक्ष, गवळी समाज

मेळघाटात सहा महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असतो. त्यानंतर येथील नदी-नाले सुकून जातात व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण होते. त्यामुळे नाइलाजास्तव वऱ्हाडात जावे लागते.

— देवराव चव्हाण, पशुपालक, जामली आर.