कर्ज फेडणार कसे? आत्महत्याच करतो ना... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

काटोल तालुक्‍यातील खंडाळा येथील शेतकऱ्याचे ओल्या दुष्काळाने मोठे नुकसान झाले. कसेबसे करून घेतलेले पीक हातून गेल्याने ते पुरते निराश झाले होते. पीकच गेल्याने घेतलेले कर्ज कसे फेडणार या विचारातून त्यांनी आत्महत्या केली. 

काटोल (जि. नागपूर) : पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकरी पार निराश झाला होता. कसेबसे करून त्यांनी शेतात पेरलेले बियाणे पाण्याविना खराब झाले. मात्र, पावसाने अधुनमधून हजेरी लावल्याने बळीराजा आनंदी झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणी केली. काही शेतकऱ्यांनी उसणवारी तर काहींनी कर्ज घेऊन शेतात बियाण्यांची पेरणी केली. काही दिवसांनी पीकही डोलायला लागले. मात्र, अतिपावसाने पुन्हा घात केला व होत्याचे नव्हते झाले. 

काटोल तालुक्‍यातील खंडाळा येथील शेतकरी तीर्थानंद नारायण चरडे (वय 37, रा. खंडाळा) यांनी यंदा गावालगत असलेल्या तीन एकर शेतजमिनीवर संत्राबाग लावली होती. उन्हाळ्यात दुष्काळात कशीबशी संत्रा बाग टिकवली. परंतु, आंबिया बहार गळल्याने ते त्रस्त झाले होते. खर्च निघावा यासाठी त्यांनी दहा ते बारा एकर शेतजमीन ठेक्‍याने केली होती. त्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी केली.

 

हेही वाचा - पुण्याला निघाली नागपूरची महिला, अन्‌ मनमाडनंतर तुटला संपर्क

 

सुरुवातीला पीक उत्तम असल्याने आर्थिक उत्पन्न चांगले होईल अशी आशा त्यांना होती. मात्र, पावसाळ्याच्या शेवटीशेवटी आलेल्या परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. जणू ओल्या दुष्काळाचे ग्रहण लागले. यामुळे त्यांना आर्थिक समस्या व नैराश्‍याने ग्रासले. एका मागोमाग एक आलेल्या संकटांनी त्यांना सावरू दिले नाही. 

शेतमशागत, बियाणे, खते, मजुरी यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेला. बॅंक ऑफ इंडिया काटोल शाखेकडून घेतलेले एक लाखाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत तीर्थानंद होते. कर्ज फेडले नाही तर बॅंकेचे अधिकारी घरी चकरा मारतील. यामुळे गावात असलेली इज्जत चाल्ली गाईल, असा विचार त्यांना सतत सतावत होता. बुधवारी सकाळी तीर्थानंद खंडाळा स्टेशनवर दोन्ही मुलांना शाळेत सोडण्यास आले होते.

 

अवश्य वाचा -  ...तर ठाकरे सरकार रचेल इतिहास

 

तेथून ते सरळ शेतात गेले. बाजूच्या शेतात पाणी ओलीत करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना झाडाला काही लटकलेले दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत तीर्थानंद आढळून आले. त्यांनी मृताचा मोठा भाऊ व वडील यांना माहिती दिली. तसेच काटोल पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालय काटोल येथे करण्यात आली. त्यानंतर तीर्थानंद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ओल्या दुष्काळाचे ग्रहण!

तीर्थानंद चरडे हे काटोल येथून पाच किमी अंतरावरील खंडाळा (खुर्द) येथे राहत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुल व आईवडील आहेत. त्यांनी शेती ठेक्‍याने घेतली होती. मात्र, ओल्या दुष्काळाचे ग्रहण लागल्याने त्यांनी बुधवारी सकाळी शेतातील झोपडी जवळील पेरूच्या झाडाला गळफास लावून जीवन संपविले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicide in Nagpur