"साहेब, कपाशीचा लागवड खर्चही नाही निघालो हो"; बोंडअळीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी  

कृष्ण गोरे
Sunday, 13 December 2020

परतीच्या पावसाचा मोठा फटका सोयाबीनला बसला. यानंतर आलेल्या गुलाबी बोंडअळी आणि बोंडसळमुळे पुन्हा कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला

राजुरा (जि. चंद्रपूर) : पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीनची लागवड मोठ्या क्षेत्रात होते.  यावर्षी बोंडअळीचा विळखा कपाशीला बसला. त्यामुळे उभ्या कपाशीवर ट्रॅक्‍टर चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आले. नव्वद टक्‍के कपाशी बोंडअळी व बोंडसळ किडीने फस्त केले आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून पंचनामे झाले नाही. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बळीराजाच्या डोळ्यात बोंडअळीने पाणी आणले आहे. 

परतीच्या पावसाचा मोठा फटका सोयाबीनला बसला. यानंतर आलेल्या गुलाबी बोंडअळी आणि बोंडसळमुळे पुन्हा कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला. परंतु अतिवृष्टीच्या नियमात हा पाऊस बसला नाही. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले.  त्यानंतर शेतकऱ्यांच्या हातातील कापसावर  गुलाबी बोंडअळीने आणि बोंडसळ किडीने हल्ला केला. 

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाची उचल करून लागवड केली. आता पिकासाठी झालेला खर्चही भरून निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. आता ढगाळ वातावरणाचा फटका तुरीला बसणार आहे. कोरोनाने आधीच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र थांबविले. आता नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. 

रब्बी- खरिपात निराशाच 

वेचणीच्या आधीच कपाशीवर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले. त्यामुळे  हताश बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात उभ्या कपाशीवर  ट्रॅक्‍टर फिरविला. बोंडअळीमुळे पीक उद्‌ध्वस्त  झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बीटी-2 बियाणांची प्रतिकार शक्ती जवळपास 106 दिवस असते.  त्यानंतर गुलाबी बोंडअळी आक्रमण करते. कोरपना, राजुरा तालुक्‍यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे मोठे नुकसान झाले. रब्बी आणि खरिपात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. 

दोन एकर मध्ये कपाशीची लागवड केली होती.  कापसावर अचानक गुलाबी बोंड अळी व बोंड सडचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशीवर ट्रॅक्‍टर फिरवून पीक काढून टाकले आहे. यात मोठे नुकसान झाले असून केलेला खर्च  वाया गेला आहे.
- भूषण कावळे,
नुकसानग्रस्त शेतकरी, पोवनी

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers are frustrated due to bad weather and crops