पीक आलं सोन्यावाणी... पण घरी येईल तवा खरी! पेरणी साधल्याने शेतकरी समाधानी

soyabean
soyabean

पुसद (जि. यवतमाळ) : खरंतर शेती म्हणजे आजच्या बदलत्या वातावरणात एक जुगार बनला आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाण्याने शेतकऱ्यांना धोका दिला. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. कुणाची दुबार पेरणी साधली, तर अनेकांची उलटली. त्यामुळे सुरुवातीलाच शेतकऱ्यांना जोरदार झटका बसला.

संभाजी टेटर यांच्या चार एकर शेतात सोयाबीन पीक डौलात उभे आहे. आलटून पालटून घरचे सोयाबीन बियाणे ते वापरतात. यंदा नवीन बियाणे चार थैल्या त्यांनी पेरल्या. पेरणीवरच हलका पाऊस आला आणि पेरणी साधली. सोयाबीन रोपे टराटरा वर आली. एक फवारणी झाली. चांगली वाढ झाल्याने डवरणी होऊ शकली नाही. त्यामुळे 35 व्या दिवशी निंदन सुरू केले. पावसाने योग्यवेळी साथ दिल्याने किडींचा प्रादुर्भाव झाला नाही व सोयाबीनची जोमदार वाढ झाली. त्यामुळे सध्या ते खुश आहेत. रानातच शिदोरी खाताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.

पस्तीस दिवसांत सोयाबीन पीक काया मातीतून तरातरा वर आलं बघा. नेमकं फुलावर हाय. डवरा बसला नाही म्हणून पहिलंच निंदण सुरू हाय. हिंमतीनं मातीत पैसा घातलाय. पीक तर सध्या सोन्यावानी हाय, पण आखरीले घरी येईन तवा खरं
पुसदलगतच्या वरुड शिवारातील प्रयोगशील शेतकरी संभाजी टेटर यांच्या शेतातील डवरलेले सोयाबीन पीक कुणाचेही लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याशी बातचीत केली, तेव्हा शेतीतील अनिश्‍चितता त्यांनी खास वऱ्हाडी शैलीत व्यक्त केली अन्‌ शेतकऱ्याची अनुभवातून आलेली चिंता सहजतेने प्रकट केली.

त्यांच्या शेताच्या बांधाला लागूनच सुदाम दादाराव सूर्य यांचे शेत आहे. त्यांनीही सोयाबीनची लागवड केली. मात्र, नशीब बलवत्तर नव्हते. पहिल्या पेरणीचे बियाणे उगवलेच नाही. कृषी विभागाकडे तक्रारी केल्यात. दुबार पेरणी केली. त्यानंतर धुवॉधार पाऊस झाला. बियाणे मातीखाली दडपून गेले व दुबार पेरणीही फसली. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीची अशी ही कथा. या प्रकाराला शेतीतील जुगार नाही का म्हणता येणार? असा प्रश्न संभाजी टेटर यांनी केला.

सविस्तर वाचा -  मोठी बातमी : दारू विक्रेत्याचा पोलिसांवर तलवारीने हल्ला

जोरदार पावसाची अपेक्षा कायम
पुसद तालुक्‍यातील सोयाबीन पिकाची अवस्था ही या उदाहरणांसारखीच बोलकी आहे. ज्यांची पेरणी साधली, त्यांचे सोयाबीन पीक जोरात आहे. मात्र, ज्यांच्या नशिबी दुबार-तिबार पेरणी आली, तेथील अवस्था बिकट आहे. सध्या पुसद तालुक्‍यात पाऊस समाधानकारक आहे. पिकांना पोषक आहे. मात्र, अजूनपर्यंत शेतातून पावसाचे पाणी वाहून न निघाल्याने नदी-नाले कोरडेच आहेत. निम्मा जुलै महिना संपून गेला, तरी पाणवठे पावसाअभावी भरलेले नाहीत. त्यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढण्यासाठी जोरदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
 
संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com