शेतकऱ्यांनो सावधान, वादळी पाऊस येतोय!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

जिल्ह्यासह विदर्भात पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करुन घ्यावी तसेच पिकाची गंजी झाकून ठेवून नुकसान टाळावे, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञांनी केले आहे.

अकोला : जिल्ह्यासह विदर्भात पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करुन घ्यावी तसेच पिकाची गंजी झाकून ठेवून नुकसान टाळावे, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञांनी केले आहे.

उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, पाराही ४० अंशापार गेला आहे. परंतु, पावसाचे सत्र अजूनही थांबलेले नाही. गेल्या मोसमापासून प्रत्येक महिन्यात पाऊस पडत असून, गेल्या तीन आठवड्यातही पावसाने वेळोवेळी हजेरी लावलेली आहे. आतापर्यंत रब्बीतील गहू, हरभऱ्याचे काही भागातील पीक शेतकऱ्यांनी काढून घरी आणले आहे तर, काहींनी शेतातच गंजी घालून ऊन देण्यासाठी ठेवले आहे. मात्र बहुतांश भागात उशिरा पेरलेले पीक अजूनही शेतातच उभे असून, काही भागात मजूर किंवा मशिन मिळत नसल्याने काढणी होऊ शकलेली नाही. सध्या पपई, कलिंगड व भाजीपाला पिकही तयार असून, काढणी बाकी आहे. अशातच पावसाचे सावट पुन्हा निर्माण झाले असून, पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून, नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्य तेवढ्या लवकर पीक काढून घरी न्यावे किंवा चांगल्याप्रकारे झाकून ठेवावे, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञांनी केले आहे.

सतर्क राहा आणि नुकसान टाळा
विदर्भासह मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढण्यासाठी तयार असलेले पीक ताबडतोब काढून घ्यावे तसेच गंजी झाकून पीक नुकसान टाळावे.
- संजय अप्तुरकर, कृषी हवामान तज्ज्ञ, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers beware rain is coming