Video : कौतुकास्पद! शेतकऱ्याची पोर झाली आंतरराष्ट्रीय सायकलपटू; बापाने बघितलेले स्वप्न मुलीने केले पूर्ण

रेवणनाथ गाढवे
Thursday, 8 April 2021

निलज बु. (जि. भंडारा) : जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द हे गाव. पायाभूत सुविधांनी व लोकसंख्येने कमी असलेले हे गाव जिल्ह्याच्या नकाशात शोधायलाही तुम्हाला नाकीनऊ येतील. परंतु, या लहान गावाचं नाव थेट गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते युरोपीय देशांपर्यंत गाजवणारी मुलगी आहे निलज खुर्दची सुशिकलाची दुर्गाप्रसाद आगाशे...

निलज बु. (जि. भंडारा) : जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द हे गाव. पायाभूत सुविधांनी व लोकसंख्येने कमी असलेले हे गाव जिल्ह्याच्या नकाशात शोधायलाही तुम्हाला नाकीनऊ येतील. परंतु, या लहान गावाचं नाव थेट गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते युरोपीय देशांपर्यंत गाजवणारी मुलगी आहे निलज खुर्दची सुशिकलाची दुर्गाप्रसाद आगाशे...

सुशिकलाला देशापुरते मर्यादित समजून चालणार नाही. या मुलीने युरोपातील इटली आणि जर्मनी यांसारख्या देशातही विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. फक्त देशाचे प्रतिनिधित्वच नाही तर भारताला योग्य स्थानही पटकावून दिले. त्यासोबतच नुकत्याच यावर्षी मार्च महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सुशिकलाने स्वर्ण पदक पटकावले.

जाणून घ्या - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात

सुशिकला ही निलज खुर्द येथे राहणाऱ्या दुर्गाप्रसाद आगाशे यांची मुलगी. वडील अल्पभूधारक शेतकरी, शेतीतून घर चालवणे बिकट झाल्यामुळे घर बांधण्याच्या कामावर जाणारे. पण मुलींना मुलाप्रमाणे वाढवत होते. ती सहाव्या वर्गात असताना तिच्यात असलेली खेळाची आवड बघून तिच्या शिक्षकांनी देव्हाडी जवळील तुडका येथे होणाऱ्या क्रीडा प्रबोधिनीला जाण्याचा सल्ला दिला.

ती रोज वडिलांबरोबर सकाळी व सायंकाळी तुडका येथील मैदानावर खेडण्यासाठी जायची. पुढे तिची निवड पुण्यातील क्रीडा प्रबोधनीसाठी झाली. पुढे सायकल चालविण्यात पारंगत झालेली सुशिकला आशियाई क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया यूथ गेम यासारख्या अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. सुशिकलामध्ये असलेली क्रीडा क्षेत्रातील कुशलता बघता तिच्या गावातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात स्वतःचे करिअर घडविण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा - Flat Foot : पाय सपाट असेल तर त्वरित करा उपचार; दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

मुलीला मोठे करण्याचे स्वप्न बघणार बाप

एकवीसाव्या शतकातही मुलींकडे हीन भावनेने बघून मुलांच्या तुलनेत यांना कमी लेखले जाते. अशातच शशिकलाचे वडील दुर्गाप्रसाद वाघाचे हे मुलींसाठी अहोरात्र कष्ट करून सुशीकला व लहान बहिणीला क्रीडा क्षेत्रात आयुष्य घडविण्यासाठी प्रोत्साहित करताना पाहायला मिळतात. सुशीकलाचे क्रीडा क्षेत्रातील हे अतुलनीय कार्य केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नसून देशासाठी केली गेलेली एक कामगिरी आहे. या कामगिरीत आई-वडिलांचाही मोठा वाटा आहे.

मोठ्या बहिणीचा आदर्श ठेवणारी निकिता

कुटुंबातील, गावातील एक व्यक्ती जर पुढे गेला तर त्या पाठोपाठ उर्वरित त्याच मार्गाला लागतात. या प्रमाणेच सुशिकलाची लहान बहीण निकिता आगाशे बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत हॉकी खेळत स्वतःचे आयुष्य घडवत आहे. तिने आजतागायत पाच वेळ राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. राज्य पातळीवर सर्वच स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले आहेत.

महत्त्वाची बातमी - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज

यालाच सामाजिक व वैचारिक परिवर्तन म्हणत असावे
ज्यावेळी खेळायला सुरुवात केली, त्यावेळी गावातील लोकांच्या बऱ्यावाईट प्रतिक्रियांना समोर जावे लागले. पण, त्यावेळी मला, आई-वडिलांना जे लोक माझ्या बाहेर राहण्यावरून, खेळाचे कपडे वापरण्यावरून टोचक प्रतिक्रिया द्यायचे तेच आज त्यांच्या मुला-मुलींना खेळायला पाठवतात. कदाचित यालाच सामाजिक व वैचारिक परिवर्तन म्हणत असावे. 
- सुशिकलाची दुर्गाप्रसाद आगाशे,
आंतरराष्ट्रीय सायकलपटू, निलज खुर्द


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers girl have become international cyclist Bhandara news