मेळघाटच्या शेतकऱ्यांना बटेर पालनातून रोजगाराच्या नवीन संधी

bater bird
bater bird

अमरावती : तंत्रज्ञान विकसित झाल्याने बटेर पक्षाचे व्यावसायिक पोल्ट्रीच्या धर्तीवर संगोपन होऊ लागले आहे. धारणी व चिखलदरा तालुक्‍यातील आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता तसेच पोषणमूल्य वाढविण्याच्या दृष्टीने शेतीला जोडधंदा म्हणून बटेर पालन व्यवसायाकरिता प्रोत्साहन दिले जात आहे. यातून शेतकऱ्यांना रोजगारदेखील मिळू लागला आहे.

घातखेडा येथील कृषी विज्ञान केंद्राने धारणी व चिखलदरा तालुक्‍यातील 20 गावांमध्ये 200 शेतकऱ्यांची निवड करून त्यांना बटेर पालनाविषयी प्रशिक्षण दिले तसेच प्रकल्पांतर्गत निवडलेल्या प्रात्यक्षिकांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना बटेर पक्षी व त्याला लागत असलेले खाद्य, औषधी व भांडे पुरवण्यात आले. या व्यवसायाचे फायदे म्हणजे बटेर पक्षी सर्व प्रकारच्या हवामानात उत्तम प्रकारे राहू शकतो. या व्यवसायात भाग भांडवल कमी लागते व लवकर मिळकत सुरू होते. 45 ते 50 दिवसांत मांसल पक्षी तयार होऊन विक्रीस उपलब्ध होतो. बटेर पक्ष्याचे मांस रुचकर व स्वादिष्ट असते. त्यामुळे त्यास मोठी मागणी आहे. काही जमाती पूर्वी या पक्ष्याची शिकार करून त्यांची विक्री करायचे, आता व्यावसायिकदृष्ट्या त्याचे संगोपन होत असल्याने शिकार बंद झाली.

अंडी महिला व बालकांना वरदान
बटेर पक्षी व त्याची अंडी, असे दोन्ही घटक विक्रीजन्य असतात. अंडी घेण्यासाठी पक्षी ठेवल्यास 45 दिवसांनंतर अंडी उत्पादनास सुरुवात होते. साधरण: एक बटेर पक्षी वर्षभरात 300 अंडी देतो. प्रामुख्याने वयोवृद्ध, गर्भवती महिला व कुपोषित बालके यांना ही अंडी म्हणजे वरदानच आहे. कारण एका अंड्यामध्ये 13 अमायनो ऍसिड, 3 फॅटिऍसिड व 10 मिनरल्स आहेत, तर मास हे अतिशय रुचकर व चवदार मऊ असून प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

घरीच होते व्यवस्थापन
ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या असल्याने अंड्यांपासून पिल्ले उबवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या हॅचरी यंत्राचा वापर करण्यात आला. धारणी व चिखलदरा तालुक्‍यातील 200 शेतकरी पती-पत्नी मिळून शेडचे व्यवस्थापन करीत आहेत. नियमितपणे शेडची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, लसीकरणाचे काम, पक्ष्यांना खाद्य, पाणी आदी कामे घरच्याघरी करण्यात येतात. त्यामुळे खर्च कमी येतो.

एका पक्षामागे 20 ते 25 रुपये खर्च
45 दिवसांत मांसल पक्षी तयार होतो. 100 पक्षांमागे 3500 ते 4 हजार रुपये मिळतात. बटेरचा मोठा पक्षी तयार करण्यासाठी प्रति पक्षी 18 ते 20 रुपये खर्च येतो. सध्या कृषी विज्ञान केंद्राची हॅचरी शेतकरी उपयोगात आणत असल्याने हा खर्च कमी आहे. मात्र हॅचरी नसताना शेतकऱ्यांना हाच खर्च सुमारे 25 ते 30 रुपये येऊ शकतो.

शिकारीला बसला आळा
पूर्वी बटेर या पक्षाची शिकार करून ती विकल्या जायची, मात्र आता व्यावसायिकदृष्ट्या संगोपन व्हायला लागल्याने शिकारीला आळा बसला. त्यामुळे बटेर पालन व्यवसाय रोजगार मिळण्यासोबतच निसर्गचक्र सुरळीत ठेवण्यासदेखील फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे.

बटेर व अंड्यांना चांगली मागणी
बटेर पालनाचे प्रशिक्षण घातखेड येथील कृषी विज्ञान केंद्रात दिले जाते. हा व्यवसाय कमी पैशात होत असून, मार्केटदेखील चांगले आहे. हॉटेल, ढाबे, आठवडी बाजार आदी ठिकाणी बटेरसह त्यांच्या अंड्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांनी याकडे वळले पाहिजे.
डॉ. शरद कठाळे,
विषय विशेषज्ञ पशू विज्ञान विभाग
कृषी विज्ञान केंद्र, घातखेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com