ज्याने जीवापाड जपले त्याच्याच जीवावर उठला हा वळू... वाचा ही करूण कहाणी

Farmers killed in ox attack at Gondia
Farmers killed in ox attack at Gondia

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : गोधनाबद्दल शेतकऱ्यांची आस्था हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यात गाईंना जसे प्रेमाने वागवले जाते, तसे वासरांनाही. थोड्या मोठ्या झालेल्या वळूंच्या बाबतीतही तेच असते. गोवंशाची वाढ त्याच्या भरवशावर होत असते. मात्र, असाच एक वळू मालकाच्या जिवावर उठला आणि त्याच्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात घडली आहे.

वळू हा मालकाचा जीव की प्राण होता. तो त्याच्या उदरनिर्वाहाचे साधनही बनला होता. मात्र, दुर्दैवाने याच जिवापाड जपलेल्या वळूने त्याला या जगातूनच उठविले. हा वळू प्रणयक्रीडेत रममाण होत असताना आड आलेल्या मालकाला त्याने वर उचलून जमिनीवर आदळले. गंभीर जखमी झालेल्या मालकावर उपचार करण्यात आले खरे, पण बुधवारी (ता. 20) त्याचा मृत्यू झाला. ही घटना इटखेडा येथे घडली. रामदास सदाशिव राजगडे (वय 55) असे मृताचे नाव आहे. 

जिल्हा गोंदिया. तालुका अर्जुनी मोरगाव. गाव इटखेडा. येथील रहिवासी रामदास राजगडे. त्यांनी एका वळूला (सांड) लहानाचे मोठे केले. त्याला जिवापाड जपले व वाढवले. त्याची आंघोळ घालण्यापासून ते चारापाण्याची सोय ते नियमित करीत होते. मध्यंतरीच्या काळात या वळूला आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनविण्याचे त्यांनी ठरविले. गाई फळविण्यासाठी त्याचा वापर करू लागले.

गेल्या 19 मे रोजी रामदास यांनी एक गाय फळविण्यासाठी आपल्या वळूला सोडले. प्रणयक्रीडेत वळू रममाण होत असतानाच काही कारणास्तव रामदास त्याच्या आड आले. त्यामुळे वळू चांगलाच खवळला. प्रणयक्रीडेत बाधा आणणाऱ्या आपल्या मालकाला वळूने लक्ष्य केले. त्यांना शिंगांवर घेऊन खाली आदळले. 

वळूने जोरात आदळल्याने रामदास गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ब्रह्मपुरी व नंतर नागपूरला हलविण्यात आले. मात्र, बुधवारी (ता.20) सायंकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. मृत रामदास यांच्यावर गुरुवारी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अशाप्रकारच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com